कोरोना रूग्णांना वेळेत उपचारासाठी सातारा राष्ट्रवादीची विशेष हेल्पलाईन - Special helpline at Satara NCP office for timely treatment of Corona patients | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोना रूग्णांना वेळेत उपचारासाठी सातारा राष्ट्रवादीची विशेष हेल्पलाईन

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

गरीब रुग्णांना माफक दरात उपचार मिळावेत, असा प्रयत्न असून, गरिबांना लागणारी औषधे व इंजेक्‍शने "ना नफा, ना तोटा' या तत्त्वावर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आमदार शिंदे यांनी स्पष्ट केले. 

कोरेगाव :  जिल्ह्यात कोरोनाबाधितांना लवकर उपचार मिळावेत, त्यांच्या नातेवाइकांची धावपळ होऊ नये, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पक्षाच्या जिल्हा कार्यालयात विशेष हेल्पलाईन सुविधा सुरू केली आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे विधान परिषदेतील पक्ष प्रतोद शशिकांत शिंदे यांनी दिली आहे.

सातारा जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज पालकमंत्री बाळासाहेब पाटील, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत झालेल्या विशेष बैठकीत मी उपस्थित केलेल्या विषयांना अनुसरून हा निर्णय झाला आहे, असे आमदार शिंदे यांनी सांगितले.

ते म्हणाले,  जिल्ह्यात विशेषत: ग्रामीण भागामध्ये रुग्णसंख्या वाढत आहे.  प्रत्येक ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑक्‍सिजनयुक्त बेडची व्यवस्था केल्यास गंभीर रुग्णांना त्यांच्या जवळपासच्या भागात उपचाराची सुविधा मिळणार आहे. परिणामी सातारा अथवा कऱ्हाड येथे गंभीर असलेल्या रुग्णांना बेड उपलब्ध होऊ शकणार आहेत.

या पार्श्वभूमीवर जागेची उपलब्धता असलेल्या जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांबरोबरच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये तातडीने ऑक्‍सिजनयुक्त बेड तयार केले जावेत. त्यावर पालकमंत्री पाटील व सभापती निंबाळकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तत्काळ प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले.

कोरेगाव येथील ग्रामीण रुग्णालयाच्या आवारातील कोविड सेंटरची क्षमता 30 वरून 100 खाटांपर्यंत वाढवून या ठिकाणी ऑक्‍सिजनयुक्त बेडची संख्या वाढवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्याच धर्तीवर पुसेगाव आणि खटावमध्येही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार असून, सातारा तालुक्‍यातील 18 गावांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वडूथ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सर्व सुविधांनीयुक्त कोविड सेंटर उभारण्यास या बैठकीत तत्त्वत: मान्यता देण्यात आल्याचे आमदार शिंदे यांनी सांगितले. 

जिल्ह्यात कोरोनाबाधितांना लवकर उपचार मिळावेत, त्यांच्या नातेवाइकांची धावपळ होऊ नये, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पक्षाच्या जिल्हा कार्यालयात विशेष हेल्पलाईन सुविधा सुरू केली आहे. तसेच गरीब रुग्णांना माफक दरात उपचार मिळावेत, असा प्रयत्न असून, गरिबांना लागणारी औषधे व इंजेक्‍शने "ना नफा, ना तोटा' या तत्त्वावर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आमदार शिंदे यांनी स्पष्ट केले. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख