शिवसेनेचा महाराष्ट्रात गुंडाराज : प्रवीण दरेकरांची टिका - Shivsena's Gundaraj in Maharashtra: Criticism of Praveen Darekar | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसेनेचा महाराष्ट्रात गुंडाराज : प्रवीण दरेकरांची टिका

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 12 सप्टेंबर 2020

राज्यात जर खरच कायद्याचे राज्य असेल तर अधिका-यांना दिवसाढवळ्या मारहाण करणा-या आरोपींना कुठल्याही परीस्थितीत जामीन मिळता नये व त्यांच्याविरुध्द कठोर कारवाई करण्याची भारतीय जनता पार्टीची आग्रही मागणी असल्याचे दरेकर यांनी नमूद केले.  

मुंबई : शिवसेना सत्तेच्या नादात आपली मूळ भूमिका विसरली असून आता शिवसेनेचा गुंडाराज सुरू झाला आहे. पोलिसांची भूमिकासुद्धा याठिकाणी संशयास्पद
वाटतेय. ज्या निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण करण्यात आली, हल्लेखोरांनी त्यांचा डोळा फोडला तसेच त्यांच्या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज
असूनही या प्रकरणातील हल्लेखोरांना जामीन मिळतो. याचा अर्थ  ठाकरे सरकारची भूमिका संशयास्पद असून या सर्व गोष्टींचा पर्दाफाश केल्याशिवाय आम्ही गप्प
राहणार नाही, असा जोरदार इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज दिला.

दरम्यान निवृत्त अधिकारी मदन शर्मा यांच्यावर हल्ला करणा-या हल्लेखोरांविरुध्द अधिक कडक कलमे लावावीत व त्यांच्याविरुध्द कठोर कारवाई करण्याची मागणी
करण्यासाठी विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर, मुंबई भाजप अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा, आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त पोलिस  आयुक्तांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. 

हल्लेखोराविरुध्द कठोर कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेऊन केली. त्यानंतर घरात घुसुन मारहाण करणा-या ठाकरे सरकारचा निषेध असो..,तानाशाही नहीं चलेगी.., दादागिरी नहीं चलेगी.., देशासाठी सेवा करणा-या अधिका-यांना मारहाण करणा-या हल्लेखोराविरुध्द कठोर कारवाई करा.., अशी जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.  त्यानंतर यासंदर्भात गृहमंत्री अनिल देशमुख व विरोधी पक्ष नेते यांची
फोनवरुन चर्चा झाली.

याप्रकरणात कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. अखेर सह पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी हल्लेखोरावंर कायद्यानसुर कडक कारवाई करण्यात येईल व राजकीय दबावाखाली पोलिस कारवाई करणार नाही, असे आश्वासन दिले व ठिय्या आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर भाजपचे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आल्याची माहिती दरेकर यांनी यावेळी दिली.

 हल्लेखोरांविरुध्द अधिक कठोर कलमे लावण्याचे आश्वासन पोलिसांनी पाळले नाही तर भाजपा याविरोधात अधिक उग्र आंदोलन करेल, असा इशाराही श्री. दरेकर यांनी यावेळी दिला. कांदिवली पूर्व येथील ठाकूर कॉम्प्लेक्स मध्ये राहणारे नौदलाचे निवृत्त अधिकारी मदन शर्मा यांनी एका व्यंगचित्र पोस्ट केल्याप्रकरणी काल त्यांना शिवसैनिकांनी बेदम मारहाण केली. यामध्ये त्यांच्या डोळ्याला दुखापत झाली. त्यांना मालाड पूर्व येथील संजिविनी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

आज सकाळी विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर आणि आमदार अतुल भातखळकर यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली व त्यांच्या प्रकतीची विचारपूस केली. याप्रकरणी न्याय मिळवून देण्याचे आश्वसानही दरेकर यांनी त्यांना यावेळी दिले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले की, झालेला प्रकार हा अतिशय दुदैर्वी आहे. ठाकरे सरकारचा जो कारभार सध्या सुरू आहे त्यामुळे या राज्यात भयाचं, भीतीचं वातावरण या राज्यात निर्माण झालयं.

ज्यांनी हल्ला केला त्यांना लगेच जामीन मिळाला. तसेच ज्यावेळी ज्या निवृत्त नौदल अधिका-यांवर हल्ला झाला त्याचवेळी पोलिस तत्परतेने त्यांना अटक करण्यासाठी गेले. अश्याप्रकारचे गुंडाराज या राज्यात सुरू आहे, अशी टिकाही दरेकर यांनी केली. निवृत्त नौदल अधिकारी ज्यांचे या देशासाठी योगदान आहे. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच सैनिकांचा सन्मान केला. व्यंगचित्रांच्या माध्यमातून त्यांच्याप्रती
सातत्याने आदर व्यक्त केला. परंतु आता सत्तेच्या नादात शिवसेना मूळ भूमिका विसरली असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. 

राज्यात जर खरच कायद्याचे राज्य असेल तर अधिका-यांना दिवसाढवळ्या मारहाण करणा-या आरोपींना कुठल्याही परीस्थितीत जामीन मिळता नये व त्यांच्याविरुध्द कठोर कारवाई करण्याची भारतीय जनता पार्टीची आग्रही मागणी असल्याचे दरेकर यांनी नमूद केले.  यावेळी भाजपचे विनोद शेलार,नगरसेवक विनोद मिश्रा, नगरसेविका सुनिता यादव, प्रभाग समिती अध्यक्षा प्रितम पंडागळे, ॲड. ज्ञानमूर्ती शर्मा, राणी द्विवेदी, ॲड. सिध्दार्थ शर्मा, आदी उपस्थित होते.  या प्रकरणातील आरोपींविरुध्द कठोर कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन निवृत्त नौदल अधिकारी शर्मा यांच्या मुलीने पोलिस स्थानकात दिले.

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख