अजित पवारांनंतर शिवतारेंनी घेतली शरद पवारांची भेट - Sharad Pawar - Vijay Shivtare meeting on the background of Corona in Purandar | Politics Marathi News - Sarkarnama

अजित पवारांनंतर शिवतारेंनी घेतली शरद पवारांची भेट

श्रीकृष्ण नेवसे 
रविवार, 27 सप्टेंबर 2020

कोरोनामुळे जर्जर झालेल्या पुरंदर तालुक्याची सर्व परिस्थिती श्री. पवार यांच्या निदर्शनास आणून देत करावयाच्या उपाय योजनासंबंधी त्यांच्याशी चर्चा केली. श्री. पवार यांनी याबाबत तात्काळ सर्व संबंधित विभागाचे मंत्री आणि अधिकारी यांना दूरध्वनी करून कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

सासवड : पुरंदर तालुक्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शिवसेना नेते व माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांची धावपळ अद्याप सुरूच आहे. आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांची मुंबईत ''सिल्व्हर ओक'' या निवासस्थानी भेट घेतली.

कोरोनामुळे जर्जर झालेल्या पुरंदर तालुक्याची सर्व परिस्थिती श्री. पवार यांच्या निदर्शनास आणून देत करावयाच्या उपाय योजनासंबंधी त्यांच्याशी चर्चा केली. श्री. पवार यांनी याबाबत तात्काळ सर्व संबंधित विभागाचे मंत्री आणि अधिकारी यांना दूरध्वनी करून कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. 

पुरंदरमधील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी चार पाच दिवसांपूर्वी श्री. शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज त्यांनी शरद पवार यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीबाबत शिवतारे म्हणाले, ''सासवड येथील प्रशासकीय इमारतीत स्वच्छता, वीज आणि पाणी यासारख्या सुविधा ताबडतोब करून तिथे कोविड सेंटर करण्याबाबत मी श्री. पवार यांना विनंती केली''.

त्याबाबत विभागीय आयुक्त सौरभ राव यांना श्री. पवार यांनी तात्काळ सूचना दिल्या. नीरा मार्केट कमिटीचा सासवड येथील बाजार सध्या कोरोनामुळे दिवे येथील क्रीडा संकुलाच्या जागेवर स्थलांतरित करावा आणि सासवड व जेजुरी ग्रामीण रुग्णालयांना ऑक्सिजन व व्हेंटीलेटर्स उपलब्ध करून द्यावेत, रुग्णांना रुग्णवाहिका वेळेवर मिळाव्यात, अशा विविध मागण्या मी केल्या होत्या.

नीरा मार्केट कमिटीचा सासवड येथील घाऊक बाजार कायमस्वरूपी दिवे येथे उभारण्यासाठीच्या प्रस्तावास मी राज्यमंत्री असताना मंजूरी घेतलेली आहे. परंतु जागा हस्तांतरणासाठी महसूल विभागाने मार्केट कमिटीकडे दोन कोटी रुपये भरण्याबाबत मागणी केली होती. मार्केट कमिटी आर्थिकदृष्ट्या फारशी सक्षम नसल्याने ही जागा नाममात्र दरात द्यावी; अशी मागणी मी पवार यांच्याकडे केली असता याबाबत त्यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना ताबडतोब तशा सूचना दिल्या. 

गुंजवणी या आपल्या ड्रीम प्रोजेक्ट असून प्रकल्पाचे काम जोरात सुरु आहे. त्याच्या निधीमध्ये कोरोनामुळे कपात करू नये आणि प्रकल्पाला सहकार्य करावे, अशी मागणीही यावेळी शिवतारे यांनी श्री. पवार यांच्याकडे केली. दरम्यान शिवतारे यांची पवार यांनी आस्थेवाईकपणे प्रकृतीची विचारणा केली. शिवतारे यांच्या प्रकृतीबाबत माहिती घेतल्यानंतर त्यांनी विविध कामांबाबत सर्व संबंधितांना फोनाफोनीही केली.

 

 

 

 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख