सह्याद्री व्याघ्र प्रकल्प; बोगस वनपाल भरतीत अधिकाऱ्यांचीच होणार चौकशी - Sahyadri Tiger Reserve Bogus forester recruitment; Inquiry of the then officers | Politics Marathi News - Sarkarnama

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प; बोगस वनपाल भरतीत अधिकाऱ्यांचीच होणार चौकशी

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

तीन वर्षांपूर्वी वनपालांची बोगस पदे येथे निर्माण केली आहेत. त्या पदांचे सही, शिक्के हे संबंधित रेंज ऑफिसरने तयार केले. त्या बोगस पदांवर कनिष्ठ दोन वनरक्षकांची नेमणूक केली आहे, याचीही सविस्तर चौकशी होईल. 

कऱ्हाड : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या ढेबेवाडी येथील कार्यालयात ढेबेवाडी, आटोली येथे दोन वनपालपदाची बोगस पदांच्या भरती प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समितीची नेमणूक केली आहे. त्याचा अहवाल लवकरच प्राप्त होणार आहे. त्यात संबंधित अधिकाऱ्यांकडेही चौकशी करण्यात येणार आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे येथील उपसंचालक उत्तम सावंत यांच्याकडे त्याचा तपास देण्यात आला आहे.

 सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या ढेबेवाडी कार्यालयातील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी वन्यजीव अभ्यासक नाना खामकर व रोहन भाटे यांनी केली आहे. त्याबाबत वनमंत्री संजय राठोड यांच्याकडे त्यांनी तक्रार केली होती. त्यानुसार या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू झाली आहे.

त्यासाठी स्वतंत्र चौकशी समिती नेमली आहे. ढेबेवाडी वन कार्यालयाचे हस्तांतरण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडे झाले. तेथे एक वन क्षेत्रपाल, एक वनपाल, पाच वनरक्षक अशी पदांची अधिकृतपणे मंजुरी आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या ढेबेवाडी कार्यालयात पाच बीट आहेत. त्या प्रत्येक बिटासाठी एक वनरक्षक असे पाच वनरक्षक मंजूर आहेत.

पाच वनरक्षकांवर एक वनपाल असतो. वनपाल यांच्यावर वन क्षेत्रपाल असतो. तीन वर्षांपूर्वी वनपालांची बोगस पदे येथे निर्माण केली आहेत. त्या पदांचे सही, शिक्के हे संबंधित रेंज ऑफिसरने तयार केले. त्या बोगस पदांवर कनिष्ठ दोन वनरक्षकांची नेमणूक केली आहे, याचीही सविस्तर चौकशी होईल. 

दोन कनिष्ठ वनरक्षकांना त्या दोन बोगस वनपालपदावर नेमले आहे, असे तक्रारीत स्पष्ट आहे. रेंज फॉरेस्ट ऑफिसरने मर्जीतले वनरक्षकांची बोगस वनपालपदावर नेमणूक केली आहे. त्यातून बोगस कामे व बोगस बिले तयार करून स्वतः वनक्षेत्रपालाने ती बिले मंजुरीसाठी शिफारस वरिष्ठ उपसंचालक कार्यालयात केली आहे.

त्यानुसार ठेकेदारांना बिले अदा झाली आहेत. अधिकृत मंजूर वनपालपदावर प्रामाणिक व्यक्ती असल्याने खोटी बिले व अंदाजपत्रके तयार करता येणार नाही म्हणून आटोली व ढेबेवाडी येथे दोन वनपालपदे बोगस तयार केली आहेत. त्या पदांचा शासकीय दरबारी अथवा वरिष्ठांची कसलीही मंजुरी अथवा परवानगी नाही. 

 

 

...यांची होणार चौकशी 
-
तीन वर्षांपासून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या ढेबेवाडी कार्यालयात झालेला व्यवहार 
- बोगस नेमणूक केलेले वनक्षेत्रपाल 
- वनक्षेत्रपालांकडून नेमणूक झालेल्या वनपालांची कागदपत्रे 
- पदांच्या नेमणुकीसाठी वापरलेले सही व वन विभागाचे शिक्के 
- वनपालांच्या कारभारात सहभागी झालेले सर्व धागे 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख