कोरोना निवारणासाठी ''रयत''कडून २.७५ कोटींची मदत : शरद पवार - Rayat Shikshan Sanstha provides Rs 2.75 crore for corona rehabilitation Says MP Sharad Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोना निवारणासाठी ''रयत''कडून २.७५ कोटींची मदत : शरद पवार

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

कोरोनाच्या संकटामुळे शाळा अद्याप सुरू नाहीत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून संस्था ऑनलाईन शिक्षण अधिक गतिमान करणार असल्याचे नमुद करून श्री. पवार म्हणाले, महाराष्ट्र कोविड-19 सारख्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या संकटातून जात आहे. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर या रोगाचे दूरगामी परिणाम होत आहेत.

 सातारा : आज समाज कोरोनाच्या संकटातून जात असताना समाजाला मदत केली पाहिजे. आलेल्या संकटावर मात केली पाहिजे हीच सामाजिक बांधिलकीची भूमिका घेऊन रयत शिक्षण संस्थेने सर्व सेवकांच्या मदतीने मुख्यमंत्री निधीसाठी दोन कोटी 75 लाख रुपये मदत केली आहे. तसेच राज्याच्या विविध ठिकाणी 38 कोविड माहिती व मदत केंद्रे उभारून लोकार्पण केल्याची माहिती माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी दिली. 

रयत शिक्षण संस्थेच्या वतीने पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या ऑनलाइन व्याख्यानात ज्येष्ठ नेते पवार बोलत होते. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील हे उपस्थित होते.

  कोरोनाच्या संकटामुळे शाळा अद्याप सुरू नाहीत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून संस्था ऑनलाईन शिक्षण अधिक गतिमान करणार असल्याचे नमुद करून श्री. पवार म्हणाले, महाराष्ट्र कोविड-19 सारख्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या संकटातून जात आहे. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर या रोगाचे दूरगामी परिणाम होत आहेत.

अशा कालखंडात संस्था ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून महाराष्ट्राची शिक्षण प्रक्रिया गतिमान करण्याचे महत्वाचे कार्य करीत आहेच, तथापी कर्मवीर जयंतीच्या निमित्ताने रयत शिक्षण संस्था सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून महाराष्ट्राच्या विविध भागात ठिकाणी रयत सेवक आणि विद्यार्थ्यांसाठी कोविड मदत केंद्रांची उभारणी केली आहे. '' 

पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक कार्यावर लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या समताधिष्ठित समाज रचनेच्या विचारांचा मोठा प्रभाव होता येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात करून समाजाच्या विकासासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग करण्याचा विचार कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आपल्या कृतीतून समाजाला दिला आहे.

आज कोरोना सारख्या रोगाच्या प्रादुर्भावाने संपूर्ण जग वेठीस धरले आहे. अशा कालखंडात सकारात्मक विचार करून येणाऱ्या प्रत्येक संकटावर आपण
सर्वांनी प्रयत्नपूर्वक मात केली पाहिजे, हाच संस्कार आणि विचार कर्मवीरांनी आपल्याला दिला आहे.''  शिक्षण हे समाज परिवर्तनाचे एकमेव साधन आहे, त्यामुळे याच कार्याला आपण महत्त्व दिले पाहिजे ही भूमिका घेऊन आण्णांनी वाटचाल केली.

आज समाज कोरोनाच्या संकटातून जात असताना समाजाला मदत केली पाहिजे. सामाजिक बांधिलकीची भूमिका घेऊन संस्थेने सर्व सेवकांच्या मदतीने मुख्यमंत्री निधीसाठी दोन कोटी 75 लाख रुपये मदत केली आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची व्यवस्था झूम ऍपच्या माध्यमातून करणे हा विज्ञानाचा चमत्कारच आहे. हा विचार अण्णांच्या संस्काराचा भाग आहे.

आज अण्णा आपल्यामध्ये नाहीत मात्र त्यांचा विचार अतिशय मजबूत आहे. शिक्षणापासून कोणतीही पिढी वंचित राहू नये या भूमिकेतून आपण
सर्वांनी काम केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.  सचिव प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर यांनी प्रास्ताविक केले. सहसचिव प्राचार्या डॉ. प्रतिभा गायकवाड यांनी आभार मानले. संस्थेचे ऑडिटर प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी सुत्रसंचालन केले. या कार्यक्रमास माजी खासदार रामशेठ ठाकूर, भगीरथ शिंदे, दिलीप वळसे पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, संस्थेच्या मॅनेजिंग
कौन्सिलचे सर्व सदस्य, शाखाप्रमुख, जनरल बॉडी सदस्य ऑनलाइन पध्दतीने सहभागी झाले होते. 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख