Minister Satej Patil
Minister Satej Patil

ऑक्‍सिजनसाठी सतेज पाटलांची धावाधाव...

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दररोज 20 केएल ऑक्‍सिजनचा पुरवठा करण्याबाबत पालकमंत्री पाटील यांनी आज थेट मुख्य सचिव कार्यालयात संपर्क साधून ऑक्‍सिजन पुरवठा करण्याबाबत मागणी केली. त्याचबरोबर मुरबाड (मुंबई-ठाणे) येथील ऑक्‍सिजन उत्पादक कंपन्यांशी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनीही संपर्क साधला.

कोल्हापूर : जिल्ह्यात सध्या रोज हजार कोरोनाबाधित होत आहेत. त्यापैकी किमान दीड-दोनशे व्यक्तींना ऑक्‍सिजनची आवश्‍यकता आहे. यासाठी आज खुद्द पालकमंत्री सतेज पाटील यांनी धावाधाव करून थेट मुंबई-ठाणे परिसरातील मुरबाड येथून रोज ऑक्‍सिजन टॅंकरची व्यवस्था केली आहे. मात्र, त्यासाठी आवश्‍यक ऑक्‍सिजनची वाहतूक करणारा टॅंकर उपलब्ध नसल्यामुळे त्या प्रयत्नावर मर्यादा येत आहेत. 

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दररोज 20 केएल ऑक्‍सिजनचा पुरवठा करण्याबाबत पालकमंत्री पाटील यांनी आज थेट मुख्य सचिव कार्यालयात संपर्क साधून ऑक्‍सिजन पुरवठा करण्याबाबत मागणी केली. त्याचबरोबर मुरबाड (मुंबई-ठाणे) येथील ऑक्‍सिजन उत्पादक कंपन्यांशी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनीही संपर्क साधला.

यासाठी आवश्‍यक असणाऱ्या टॅंकरच्या उपलब्धतेबाबत प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ.स्टीव्हन अल्वारीस यांना सूचना दिल्या गेल्या आहेत. त्यांच्याकडून ही तसेच पालकमंत्री पाटील यांनीही ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. तरीही टॅंकर उपलब्ध होण्यावर मर्यादा आल्या आहेत. फरिदाबाद, दिल्ली पासून ऑक्‍सिजन उपलब्ध करण्याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात सुमारे चार-साडेचार तास प्रयत्न झाले. तरीही मर्यादा असून टॅंकर उपलब्ध होताच ऑक्‍सिजनचा पुरवठा होईल, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

नायट्रोजनचा परवाना आता ऑक्‍सिजनसाठी...

ऑक्‍सिजन वाहतुकीसाठी टॅंकर उपलब्ध होत नाही. सध्या कोल्हापुरातील उत्पादकाकडे नायट्रोजन वाहतूक करणारा टॅंकर उपलब्ध आहे. मात्र, त्याला नायट्रोजन वाहतुकीचा परवाना असल्यामुळे ऑक्‍सिजनची वाहतूक करता येत नाही. परिणामी तातडीची गरज म्हणून नायट्रोजन वाहतुकीचा परवाना बदलून त्यांना ऑक्‍सिजन पुरवठा करण्याचा परवाना देण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. असे झाले तरच जिल्ह्याला ऑक्‍सिजनचा पुरवठा होणार आहे.

जिल्ह्यात पुरेसे उत्पादन पण...

कोल्हापूर जिल्ह्यातच ऑक्‍सिजनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. त्याच्याकडील उत्पादनानुसार जिल्ह्याला इतरांकडून ऑक्‍सिजन मागण्याची गरज नाही. मात्र त्यांच्याकडून सांगली, रत्नागिरी, कर्नाटकातही पुरवठा केला जात आहे. त्यामुळे उत्पादन क्षमता असतानाही त्यांना कोल्हापूरची गरज भागविता येत नसल्याचे दिसून येत आहे. कोल्हापुरात ऑक्‍सिजन पुरवठा केला तर इतरांना देता येत नाही. त्यामुळे ऑक्‍सिजनसाठी धावाधाव करावी लागत आहे.

...म्हणून नियम पाळा, घरीच रहा

सप्टेंबरमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याची शक्‍यता आहे. ऑक्‍सिजनसह इतर वैद्यकीय सुविधांच्या पुरवठ्यांवर मर्यादा आहेत. त्यामुळे मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर राखणे, वारंवार हात धुणे, अनावश्‍यक गर्दी न करणे, लक्षणे दिसताच आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधणे याची नागरिकांनी प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. स्वत:सह इतरांचीही काळजी आणि दक्षता घ्यावी, असे आवाहनही पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com