महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीचे दूरदर्शनवरून थेट प्रक्षेपण - Doordarhan to telecast live from ChaityaBhoomi | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार म्हणतात, "मला वाटतं मुख्यमंत्री व्हावं, कुणी करणार का.."
धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराची तक्रार मागे

महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीचे दूरदर्शनवरून थेट प्रक्षेपण

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2020

कोव्हिडमुळे यंदा ६ डिसेंबरला महापरिनिर्वाणदिनी महापाकिलेच्या वतीने दादर येथील चैत्यभूमी परिसरात नागरी सुविधा पुरविण्यात येणार नाही; मात्र रंगरंगोटी, डागडुजीचे काम सुरू आहे. तसेच शासकीय मानवंदना होणार आहे. शासकीय मानवंदना आणि अभिवादनाचे ऑनलाईन प्रक्षेपण करण्याबरोबरच थेट प्रक्षेपणासाठी दूरदर्शनला महापालिकेने विनंती केली आहे

मुंबई  : कोव्हिडमुळे यंदा ६ डिसेंबरला महापरिनिर्वाणदिनी महापाकिलेच्या वतीने दादर येथील चैत्यभूमी परिसरात नागरी सुविधा पुरविण्यात येणार नाही; मात्र रंगरंगोटी, डागडुजीचे काम सुरू आहे. तसेच शासकीय मानवंदना होणार असून, हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टीही करण्यात येणार आहे; मात्र कोव्हिडमुळे अनुयायींनी चैत्यभूमीवर येऊ नये, असे आवाहन महापालिकेसह विविध आंबेडकरी संघटनांनी केले आहे.

शासकीय मानवंदना आणि अभिवादनाचे ऑनलाईन प्रक्षेपण करण्याबरोबरच थेट प्रक्षेपणासाठी दूरदर्शनला महापालिकेने विनंती केली आहे. गोराई येथील ग्लोबल पॅगोडाही ५ ते ७ डिसेंबर या काळात बंद राहणार आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी दर वर्षी चैत्यभूमीवर देशाच्या कानाकोपऱ्यांतून लाखो अनुयायी अभिवादनासाठी येतात; मात्र यंदा अनुयायींनी चैत्यभूमीवर येऊ नये, असे आवाहन केले आहे. चैत्यभूमीवर सध्या सुरू असलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी आज महापालिका, पोलिस तसेच विविध आंबेडकरी संघटनांची बैठक झाली. बैठकीला अतिरिक्त पोलिस आयुक्त ज्ञानेश्‍वर चव्हाण, पोलिस उपायुक्त प्रणय अशोक, पालिकेचे सहायक आयुक्त किरण दिघावकर, गजानन बेल्लाळे, स्वप्नजा क्षीरसागर उपस्थित होते. तसेच संघटनांचे प्रतिनिधी म्हणून चंद्रकांत कसबे, नागसेन कांबळे, रमेश जाधव, भिकाजी कांबळे, रवी गरुड, प्रदीप कांबळे, प्रतीक कांबळे, सचिन कांबळे उपस्थित होते.

दिघावकर यांनी चैत्यभूमीवर सुरू असलेल्या तयारीची माहिती बैठकीत दिली. यात चैत्यभूमी वास्तू, अशोकस्तंभ, तोरण प्रवेशद्वार येथे पुष्प सजावट करण्यात येईल. तसेच महत्त्वाच्या व्यक्तींसाठी नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार आहे. अग्निशमन बंब, अतिदक्षता रुग्णवाहिनी, चार बोटी, जलसुरक्षारक्षकही तैनात करण्यात येतील. अनुयायींना चैत्यभूमीवर न येता अभिवादन करता यावे यासाठी कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपण करण्यात येणार असून, दूरदर्शनलाही थेट प्रक्षेपणाची विनंती केली आहे, असे नमूद केले आहे. बैठकीत अनुयायींनी चैत्यभूमीवर येऊ नये, असे आवाहन करण्याचा निर्णय घेण्यात आला. गोराई येथील दि ग्लोबल विपश्‍यना पॅगोडाही ५ ते ७ डिसेंबर या काळात बंद ठेवण्याची विनंती पालिकेने केली होती. त्यानुसार हा पॅगोडाही या काळात बंद राहणार आहे.

पत्र पाठवून अभिवादन करा!
महापरिनिर्वाणदिनानिमित्त चैत्यभूमीवर पत्र पाठवून अभिवादन करता येणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन, असा मजकूर लिहून नाव व पत्त्यासह चैत्यभूमी स्मारक, दादर पश्‍चिम मुंबई-४०००२८ या पत्त्यावर पोस्टाने पाठवावे, असे आवाहन विश्‍वशांती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रतीक कांबळे यांनी केले आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख