पुढील वर्षीही कोरोना राहणार; कोरोनाची दुसरी लाट सुरू : डॉ. गुलेरीया   - Corona will remain next year; Second wave of Corona begins Says AIIMS Director General Dr. Guleria | Politics Marathi News - Sarkarnama

पुढील वर्षीही कोरोना राहणार; कोरोनाची दुसरी लाट सुरू : डॉ. गुलेरीया  

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 5 सप्टेंबर 2020

देशात या वर्षाअखेरपर्यंत किंवा पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीतच कोरोना लस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होईल, असे केंद्राचे मत आहे.  तज्ज्ञांच्या मते, देशात कोरोनाच्या सामूहिक उद्रेकाला (कम्युनिटी स्प्रेड) ऑगस्टपासूनच सुरवात झाली आहे. याचा सातत्याने इन्कार करणाऱ्या केंद्र सरकारकडून गेला आठवडाभर या मुद्यावर बोलण्याचे टाळण्यात आल्याचे दिसते. 

नवी दिल्ली : कोरोनाचा संसर्ग भारतात पुढील वर्षीही (२०२१) कायम राहण्याची भीती आहे. केंद्र सरकारच्या कोरोना कृती गटाचे सदस्य व दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) महासंचालक डॉ. रणदीप गुलेरीया यांनीच ही व्यक्त केली आहे. मोठ्या प्रमाणावर लोक आरोग्याचे नियम पाळत नसल्याने दिल्लीसह देशाच्या अन्य काही भागांत कोरोनाची दुसरी लाट आल्याचे दिसत आहे, असेही त्यांनी सांगितले. 

डॉ. गुलेरिया यांनी एका खासगी वाहिनीला सांगितले की, कोरोनाचा संसर्ग २०२१ संपेपर्यंत जाईल असे आम्ही आज तरी सांगू शकत नाही. एवढे मात्र निश्‍चित सांगता येते की आमच्या देशात रुग्णसंख्या वाढण्याऐवजी रुग्णसंख्येच्या आकड्याचा कल स्थिर राहील.

पुढील वर्षीच्या सुरुवातीला आम्ही कोरोनाचा परतीचा प्रवास सुरू करण्याच्या परिस्थितीत आलो पाहिजे यादृष्टीने काम करणे आवश्‍यक आहे.’’  दिल्लीसह देशाच्या इतर काही भागांत कोरोनाची दुसरी लाट येताना दिसते याची दोन कारणे आहेत असे सांगून डॉ. गुलेरिया म्हणाले की देशात चाचण्यांची संख्या वेगाने वाढत आहे व लोक नियमांचे पालन करता हलगर्जीपणा करू लागले आहेत. 

वर्षअखेरीस लस येणार, सारे काही निर्धारित वेळापत्रकाप्रमाणे सुरळीत होत गेले तर कोरोनावरील भारतीय लस यावर्षीच्या अखेरपर्यंत निश्‍चित येईल, अशी आशा व्यक्त करून डॉ. गुलेरिया म्हणाले, भारतात तीन लसींच्या चाचण्या प्रगतीपथावर आहेत. मात्र, कोणतीही लस जनतेला उपलब्ध करून देण्याआधी तिची सुरक्षितता सर्व बाजूंनी व्यवस्थित तपासणे गरजेचे असते. त्याची काळजी घेऊनच कोरोना लसीबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले. 

कोरोना संक्रमितांचा आकडा वेगाने वाढत असून देशात मागच्या तीन दिवसांत दररोज आढळणाऱ्या नव्या रुग्णांची संख्या ८० ते ८६ हजारांचा टप्पा पार करून गेली आहे. मागील तीन दिवसांत रोज विक्रमी म्हणजे किमान ८० हजार व त्यापेक्षा जास्त नवे रुग्ण आढळत आहेत. मागील केवळ १३ दिवसांत तब्बल १० लाखांनी रूग्णसंख्या वाढणे हा वाढत्या चिंतेचा विषय असतानाच मृत्यूदर घटून १.७३ झाल्याचे केंद्रीय आरोग्य यंत्रणेचे म्हणणे आहे. 

देशात या वर्षाअखेरपर्यंत किंवा पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीतच कोरोना लस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होईल, असे केंद्राचे मत आहे.  तज्ज्ञांच्या मते, देशात कोरोनाच्या सामूहिक उद्रेकाला (कम्युनिटी स्प्रेड) ऑगस्टपासूनच सुरवात झाली आहे. याचा सातत्याने इन्कार करणाऱ्या केंद्र सरकारकडून गेला आठवडाभर या मुद्यावर बोलण्याचे टाळण्यात आल्याचे दिसते. 

१३० कोटी लोकसंख्येपैकी आतापावेतो फक्त ४ कोटी ७७ हजार चाचण्या पूर्ण झालेल्या आहेत. कोविड-१९ महामारीच्या संक्रमित रूग्णसंख्येबाबत अमेरिका व ब्राझीलपाठोपाठ सर्वाधिक ४० लाखांहून जास्त सक्रिय रूग्ण असणाऱ्या भारतातील परिस्थिती दर महिन्यागणिक भयावह होत चालली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या दाव्यानुसार आज (शनिवार) सकाळपर्यंत ३१ लाख ०७ हजार २२३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहेण.

बरे होणाऱ्यांचे प्रमाणही ७७.२३ पर्यंत वाढले आहे. रुग्णांची संख्या १० लाखांहून २० लाखांपेक्षा जास्त होण्यास केवळ २१ दिवसांचा काळ लागला व २० लाख ते ३० लाखांचा टप्पा गाठण्यास १६ दिवस ( ७ ते २३ ऑगस्ट) लागले होते. देशात एक लाखांपर्यंत रुग्णसंख्या होण्याचा टप्पा ११० दिवसांनी आला होता. मात्र नंतर हे अंतर सातत्याने घटत चालले आहे. 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख