मुंबई महापालिका करणार चैत्यभूमीचे सुशोभीकरण, दुरूस्ती - BMC to undertake Beautification of Chaitya Bhoomi at Dadar | Politics Marathi News - Sarkarnama

मुंबई महापालिका करणार चैत्यभूमीचे सुशोभीकरण, दुरूस्ती

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी असलेल्या दादर येथील चैत्य भुमीची दुरुस्ती आणि सुशोभीकरण महापालिका करणार आहे. चैत्यभुमीच्या देखभालीसाठी महापालिकेकडे २८ कोटी रुपये जमा असून त्यातून ही दुरुस्ती तातडीने करुन घ्यावी, असे आदेश  स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी आज प्रशासनाला दिले

मुंबई  : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी असलेल्या दादर येथील चैत्य भुमीची दुरुस्ती आणि सुशोभीकरण महापालिका करणार आहे. चैत्यभुमीच्या देखभालीसाठी महापालिकेकडे २८ कोटी रुपये जमा असून त्यातून ही दुरुस्ती तातडीने करुन घ्यावी, असे आदेश  स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी आज प्रशासनाला दिले. गेल्या १८ वर्षांपासून राज्य सरकारकडून नियमीतपणे पालिकेला चैत्यभुमीच्या देखभालीसाठी निधी येत आहे; मात्र हा निधी अद्याप खर्च झालेला नाही.

दादर येथील चैत्यभुमीची डागडुची राज्य सरकारने करावी, असे पत्र सप्टेंबर महिन्यात महानगर पालिकेने सरकारला पाठवले होते. यावरुन आज स्थायी समितीच्या बैठकीत भाजपचे भालचंद्र शिरसाट यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करुन महापालिकेनेच चैत्यभुमीची डागडुजी तसेच सुशोभीकरण करावे, अशी मागणी केली. चैत्यभुमीच्या पुनर्बांधणीसाठी महापालिकेने वर्षभरापुर्वी वास्तुविषारदची नियुक्ती केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शेजारील इंदू मिल मध्ये स्मारक होत असताना चैत्यभुमीकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही, असे त्यांनी सांगितले. 

त्यावर तत्काळ दुरुस्ती बाबत निर्णय घेऊन याबाबत पुढील बैठकीत माहिती सादर करण्याचे निर्देश स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले. राज्य सरकारकडून २००२ पासून चैत्यभुमीच्या देखभालीसह डागडूजी आणि सुशोभीकरणासाठी पालिकेला निधी मिळत आहे. हा निधी अद्याप खर्च झालेला नाही. या खर्चातून डागडुजी आणि सुशोभीकरण करता येईल, असेही  स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले.

समुद्र किनाऱ्यांचे सुशोभीकरण
माहिम चौपाटीच्या सुशोभीकरणानंतर महापालिका आता दादर चैत्य भुमी ते प्रभादेवीपर्यंतच्या समुद्र किनाऱ्यांचेही सुशोभीकरण करणार आहे. या सुभोगीकरणात शोभिवंत दिवे तसेच झाडे लावण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यटकांसाठी हा किनारा आता आकर्षण ठरणार आहे. या सुशोभीकरणाला स्थायी समितीनेही मंजुरी दिली आहे. दादर चौपाटीवरुन वाळूतून पुर्वी थेट प्रभादेवी पर्यंत चालत जाता येत होते. घोड्यांचे रपेटीसोबत भेळपुरी पाणी पुरी यांची लज्जतही चाखता येत होती. मात्र, ९० च्या दशकानंतर समुद्राच्या आक्रमणामुळे किनाऱ्याचे मोठे नुकसान झाले. त्यांचे पुन्हा पुनरूज्जीवन करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे.
Edited By- Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख