मुंबई : 'बर्ड फ्लू'मुळे राज्यातील २२ जिल्हे प्रभावित झाले आहेत. आतापर्यंत ११५१ विविध पक्षी मृत झाले आहेत. अहमदनगर, यवतमाळ, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यांत पक्षी मृत होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे.
राज्यातील कुक्कुट पक्ष्यांमध्ये विविध जिल्ह्यांत ठाणे ३५, रायगड चार, सातारा नऊ, सांगली २०, अहमदनगर १५१, बीड २५, लातूर २५३, उस्मानाबाद, अमरावती ९०, यवतमाळ २०५, नागपूर ४५, वर्धा १०९, चंद्रपूर चार, गोंदिया २३, गडचिरोली दोन असे १८२ पक्षी मृत झाले आहेत. आतापर्यंत एकूण २२ जिल्ह्यांमध्ये कुक्कुट पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे.
बगळे, पोपट, चिमण्या अशा अन्य पक्ष्यांमध्ये विविध जिल्ह्यांत मुंबई दोन, ठाणे २९, रायगड एक, रत्नागिरी पाच, कोल्हापूर तीन, नाशिक 18, अहमदनगर दोन, लातूर एक, नांदेड दोन, यवतमाळ तीन व वर्धा एक अशी एकूण ६७ पक्ष्यांची आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत इतर पक्ष्यांत एकूण २१ जिल्ह्यांत मृत्यू झाला आहे. कावळ्यांमध्ये विविध जिल्ह्यांत मुंबई पाच, ठाणे ३८, रायगड सहा, रत्नागिरी आठ, पुणे एक, सातारा दोन, कोल्हापूर, नाशिक तीन, नंदुरबार एक, बीड सहा, परभणी एक व नांदेड पाच अशाप्रकारे एकूण राज्यात ८७ पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत एकूण २२ जिल्ह्यांमध्ये कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील आतापर्यंत एकूण ९८२ पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. संबंधित नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेच्या प्रयोगशाळेत व पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येत आहेत.
पूर्वी पाठवलेल्या नमुन्यांचे तपासणीचे निष्कर्ष प्राप्त झाले असून, त्यानुसार मुंबई, ठाणे व दापोली येथील कावळे, बगळे तसेच मुरुबा-परभणी येथील पोल्ट्री फार्ममधील नमुने हायली पेंथोजेनिक एव्हीयन एन्फ्ल्यूएन्झा (एच५एन१ या स्ट्रेन)करिता आणि बीड येथील कावळ्यामधील नमुने (एच५एन८ या स्ट्रेन)करिता पॉझिटिव्ह आले आहेत.
कुक्कुट पक्ष्यांमधील काही नमुने पॉझिटिव्ह आले असून, त्यात परभणी जिल्ह्यातील कृपटा, लातूर जिल्ह्यातील तोंदर वंजारवाडी, नांदेड जिल्ह्यातील पापलवाडी, पुणे जिल्ह्यातील चांदे, सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा, बीड जिल्ह्यातील लोखंडी सावरगाव, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, रायगड जिल्ह्यातील पेण येथील कुक्कुट पक्ष्यांचे नमुने 'बर्ड फ्लू'साठी पॉझिटिव्ह आले आहेत. अमरावती व अकोला जिल्ह्यातील कुक्कुट पक्ष्यांचे नमुने नकारार्थी आहेत.
सर्व पोल्ट्रीधारक तसेच सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, राज्यातील कोणत्याही गावांमध्ये कावळे, पोपट, बगळे किंवा स्थलांतरित होणारे पक्षी मृत्यू झाल्याचे आढळून आल्यास किंवा व्यावसायिक पोल्ट्री फार्ममधील पक्ष्यांमध्ये नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात मृत्यू झाल्यास नजीकच्या पशुवैद्ययकीय दवाखान्यात याची माहिती द्यावी - अनुपकुमार, प्रधान सचिव, पशुसंवर्धन विभाग
Edited By - Amit Golwalkar

