गृहराज्यमंत्र्यांच्या साताऱ्यात पोलिसांवर हल्ला, दोघे ताब्यात - Assault on police in Home Minister's district | Politics Marathi News - Sarkarnama

गृहराज्यमंत्र्यांच्या साताऱ्यात पोलिसांवर हल्ला, दोघे ताब्यात

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 21 ऑक्टोबर 2020

गृहराज्यमंत्री राहात असलेल्या सातारा शहरातच पोलिसांवर हल्ला झाल्याने कायदा व सुव्यवस्था आहे कुठे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.  सातारा शहराजवळ असलेल्या शिवराज पेट्रोल पंपाजवळील विलासपूरमध्ये ही घटना घडली आहे.

सातारा : साताऱ्यात कर्तव्या संपवून घरी निघालेल्या दोन पोलिसांवर प्राणघातक हल्ला झाला आहे. यामध्ये एक पोलिस गंभीर जखमी झाला आहे. दोघांनाही उपचारासाठी  रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस स्मृतिदिनाच्या पूर्व संध्येलाच ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. हल्ला करणाऱ्या दोन्ही संशयितास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

गृहराज्यमंत्री राहात असलेल्या सातारा शहरातच पोलिसांवर हल्ला झाल्याने कायदा व सुव्यवस्था आहे कुठे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.  सातारा शहराजवळ असलेल्या शिवराज पेट्रोल पंपाजवळील विलासपूरमध्ये ही घटना घडली आहे. रात्री उशीरा पोलिस कर्मचारी दत्ता डोलारे, मुधकर हिंडे हे दोन कर्मचारी ड्युटी संपल्यावर मित्रांसमवेत कणसे धाबा येथे जेवण करण्यासाठी निघाले होते.

त्यावेळी हॉटेल मानसीजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या भाजीपाल्याच्या
गाड्याजवळ श्री. डोलारे यांच्या ओळखीचे मनोज डांगरे यांनी येथे का उभा आहे, असे विचारले. यावरून डोलारे व डांगरे यांच्यात वाद सुरू झाला. त्यावेळी मनोज डांगरे यांनी आपला साथीदार प्रसाद महामुनी व इतरांना बोलावून घेतले. प्रसाद महामुनी हे येताना हातात लोखंडी पाईप घेऊन आले. त्यांनी डोलारे यांच्या डोक्यात पाईपने मारहाण करून गंभीर जखमी केले.

तसेच हवालदार मधुकर हिंडे यांच्याही हातावर पाईप मारून जखमी केले. यानंतर दोन्ही जखमी पोलिसांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले आहे. सातारा शहर पोलिस ठाण्यात याबाबत दत्ता डोलारे यांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारानंतर स्थानिक गुन्हे शाखा व गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी तातडीने संबंधित संशयितांचा शोध घेऊन मनोज डोंगरे (गणेशनगर, विलासपूर, ता. सातारा), प्रसाद विकास महामुनी (रा.  विलासपूर) यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाची चौकशी सहायक पोलिस अधीक्षक आंचल दलाल या करत आहेत. 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख