"आशा'चीच दुर्दशा; बेडविना सासूने सोडले प्राण - Asha Swayamsevak's mother-in-law died without treatment | Politics Marathi News - Sarkarnama

"आशा'चीच दुर्दशा; बेडविना सासूने सोडले प्राण

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

आशा स्वयंसेविकेच्या सासूंना हॉस्पिटलमध्ये बेड मिळावा, यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, आशा प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक करण जगताप, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, तालुका समूह संघटक योगेश सूर्यवंशी यांनी सातत्याने फोन करूनही त्यांना बेड मिळाला नाही.

कऱ्हाड : आशा स्वयंसेविकेच्या सासूंना हॉस्पिटलमध्ये बेड मिळावा, यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, आशा प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक करण जगताप, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, आदींनी सातत्याने फोन करूनही त्यांना बेड मिळाला नाही. अखेर बेड न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

एवढ्यावरच थांबले नाही तर मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह रॅपलिंग कोणी करायचा म्हणून रात्री उशिरापर्यंत तो रुग्णालयासमोर रुग्णवाहिकेतच होता. कोरोना संकट काळात जीवावर उदार होऊन सर्व्हेचे काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकेच्या सासूंबाबत घडलेल्या या प्रकाराबाबत व्यवस्था किती निष्ठूर झालीय हे उघड झाले आहे. 

साकुर्डी येथील आशा स्वयंसेविकेच्या सासुबाई तीन दिवसांपूर्वी कोरोनाबाधित झाल्या. त्यानंतर त्यांना कोणत्याही रुग्णालयात बेडच मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी प्रयत्न करून ऑक्‍सिजन यंत्र मिळवून घरीच त्यांना लावले. मात्र, काल रात्री अचानक वादळी पाऊस झाला. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी त्यांचे ऑक्‍सिजन मशिन बंद पडल्याने त्यांचा कृत्रिम श्वास बंद झाला.

त्यामुळे त्यांना श्वसनाचा त्रास होऊन त्या अत्यवस्थ झाल्या. त्यांना व्हेंटिलेटरची गरज होती. त्यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांनी 108 रुग्णवाहिकेतून त्यांच्या सासूबाईंना एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी त्या घेऊन आल्या. दुपारी एक वाजता आलेल्या महिलेला सायंकाळपर्यंत त्या हॉस्पिटलमध्ये बेडच मिळाला नाही. त्यानंतर त्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी न्या, असे सांगण्यात आले. 

त्यानुसार त्यांनी त्यांना उपजिल्हा रुग्णालयात नेले. मात्र, आशा स्वयंसेविकेच्या सासूंना हॉस्पिटलमध्ये बेड मिळावा, यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, आशा प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक करण जगताप, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, तालुका समूह संघटक योगेश सूर्यवंशी यांनी सातत्याने फोन करूनही त्यांना बेड मिळाला नाही.

दरम्यान त्यांचा बेडअभावी मृत्यू झाला. मृत्यूनंतरही त्यांचा मृतदेह रॅपलिंग कोणी करायचा म्हणून बराच काळ तो रुग्णालयासमोरील रुग्णवाहिकेतच होता. त्यावरून खल सुरू होता. कोरोना संकट काळात कशाचीही पर्वा न करता काम करणाऱ्या एका आशा स्वयंसेविकाच्या सासूबाबत ही घटना घडली. त्यामुळे या निष्ठूर ट्रिटमेंटबाबत गावातून आश्‍चर्यच व्यक्त होत आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख