सातारा : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणूकीच्या निमित्ताने सध्या अनेक चर्चांना उधाण आलेले असतानाच खासदार उदयनराजे भोसले सुरूची या आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निवासस्थानी पोहोचले. निमित्त होते नाशिक सुरगना येथे होणाऱ्या आपल्या मामाच्या मुलाच्या लग्नाचे निमंत्रण देण्याचे. खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रसिंहराजेंना लग्नपत्रिका देऊन लग्नास येण्याची विनंती केली.
आनेवाडी टोलनाक्याच्या वादानंतर प्रथमच खासदार उदयनराजे सुरूचीवर आल्यामुळे अनेकांना सुखद धक्का बसला. खासदार उदयनराजे भोसले व साताऱ्याचे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे दोघेजरी भारतीय जनता पक्षात असले तरी त्यांच्यातील राजकिय वाद कायम आहे. पण राजघराणे म्हणून हे दोघे एकत्र असतात. पण उदयनराजेंना वाटेल त्यावेळी ते शिवेंद्रसिंहराजेंची भेट घेत असतात.
सध्या जिल्हा बँकेच्या निवडणूकीवरून राजकिय हालचाली गतीमान झालेल्या आहेत. त्यातच भाजपकडून उदयनराजे व रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या माध्यमातून जिल्हा बँकेत पॅनेल टाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी शिवेंद्रसिंहराजेंना कोणत्याही परिस्थितीत भाजपच्या पॅनेलमध्ये घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे सातारच्या या दोन्ही राजांवर सर्वांल लक्ष केंद्रीत झालेले आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर आज प्रथमच खासदार उदयनराजे भोसले हे सुरूची या आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यांनी शिवेंद्रसिंहराजे यांची भेट घेऊन नाशिक येथे होणाऱ्या आपल्या मामाच्या मुलाच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका दिली. तसेच लग्नास येण्याचे निमंत्रणही दिले. भेटीचे कारण घरगुती असले तरी उदयनराजे थेट सुरूची बंगल्यात आल्याचे पाहून अनेकांना सुखद धक्का बसला.

