शेंद्रे-कागल महामार्गाचे सहापदरीकरण 'बीओटी' तत्वावर सुरू होणार; मंत्री नितीन गडकरींचे उदयनराजेंना आश्वासन - Work on Shendre-Kagal highway will start on BOT basis; Minister Nitin Gadkari assured Udayanraje | Politics Marathi News - Sarkarnama

शेंद्रे-कागल महामार्गाचे सहापदरीकरण 'बीओटी' तत्वावर सुरू होणार; मंत्री नितीन गडकरींचे उदयनराजेंना आश्वासन

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 10 फेब्रुवारी 2021

कराड येथील कोल्हापूर नाक्‍यावर उड्डाण पूल उभारण्याची मागणी केली आहे. या पुलाचे काम लवकरच सुरू होणार असून त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्याचे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सांगितले. यावेळी पुणे ते शेंद्रे या महामार्गाची रखडलेली कामे आणि रस्त्याची झालेली दुरवस्था तसेच खंडाळा बोगद्याच्या कामांबाबत ही चर्चा झाली. 

सातारा : अनेक वर्षांपासून रखडलेल्या शेंद्रे ते कागल महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामाची प्रक्रिया तात्काळ सुरू करून 'बांधा-वापरा-हस्तांतरीत करा' या तत्वावर काम सुरू करण्याच्या सूचना केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. 

सातारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण आणि पुणे ते सातारा दरम्यानच्या महामार्गाच्या रखडलेल्या विविध कामांबाबत आज खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय रस्ते, परिवहनमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी राज्यातील रस्ते विकासाच्या कामांच्या मागणीचे निवेदन गडकरी यांना दिले.

त्यानंतर गडकरी यांनी शेंद्रे-कागल महामार्गाच्या कामाबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ निविदा काढण्याच्या सूचनाही दिल्या. यावेळी उदयनराजे भोसले यांनी मंत्री गडकरी यांना राजमुद्रा भेट दिली. उदयनराजे म्हणाले, जिल्ह्याच्या विकासातील महत्वाचा टप्पा असलेल्या रस्त्यांचे जाळे अधिक भक्कम कसे होईल.

तसेच जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग आणि महामार्गाला जोडणारे जिल्ह्यांतर्गत रस्ते मजबूत करून पायाभूत सुविधा वाढवण्यावर आपला भर आहे. त्यासाठी केंद्राच्या माध्यमातून आवश्यक तो निधी मिळवण्याबाबत गडकरी यांच्याशी चर्चा झाली. ते म्हणाले, शेंद्रे ते कागल महामार्गावर कराड शहरातील वाहतुकीची कोंडी आणि होणारे अपघात दिवसेंदिवस वाढत चालले आहे.

या मार्गावर कराड येथील कोल्हापूर नाक्‍यावर उड्डाण पूल उभारण्याची मागणी केली आहे. या पुलाचे काम लवकरच सुरू होणार असून त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्याचे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सांगितले. यावेळी पुणे ते शेंद्रे या महामार्गाची रखडलेली कामे आणि रस्त्याची झालेली दुरवस्था तसेच खंडाळा बोगद्याच्या कामांबाबत ही चर्चा झाली. 

याशिवाय कराड ग्रामीण भागातून शहराच्या दिशेने येणारे रस्ते कराड शहराभोवती रिंगरोडच्या माध्यमांतून जोडण्याचा प्रस्ताव आहे. हा रस्ता तासवडे-शहापूर-अंतवडी-कार्वे-वडगांव-हवेली-कोडोली-पाचवड फाटा असा आहे. यामुळे कराड शहराच्या पूर्व भागाला जोडणार हा रिंगरोड असेल. तर साकुर्डी-येणके-येरावळे-विंग-धोडेवाडी फाटा ते पाचवड हा पश्चिम भागाला जोडणारा रिंगरोड असेल. तर पाटण तालुक्यांतील डिचोली कोयनानगर-हेळवाक-मोरगिरी-म्हारूल हवेली-विंग-वाठार-रेठरे-शेणोली स्टेशन या राज्य महामार्गाचे रूंदीकरण करण्याच्या प्रस्तावावरही चर्चा झाली.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख