आमदार, खासदारांना घराबाहेर पडू देऊ नका; मराठा आरक्षणावर ज्येष्ठ नेते गप्प का : उदयनराजेंचा सवाल  - Why senior leaders are silent on Maratha reservation MP Udayanraje's question | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार, खासदारांना घराबाहेर पडू देऊ नका; मराठा आरक्षणावर ज्येष्ठ नेते गप्प का : उदयनराजेंचा सवाल 

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 9 एप्रिल 2021

मराठा समाजातील आमदार व खासदारांप्रमाणे इतर समाजातील आमदार खासदारांनी मराठा आरक्षणाच्या लढ्याला पाठिंबा दिला पाहिजे. कारण त्यांना मराठा समाजही मतदान देत असतो, असे स्पष्ट करून उदयनराजे म्हणाले, "न्यायालय काय निकाल देतेय हे पाहावे लागेल. न्याय देवतेला माझी कळकळीची विनंती आहे, की मराठ्यांवर अन्याय होऊ नये.

पाटण : अन्य समाजाप्रमाणे मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे. मराठा आरक्षणासंदर्भात न्यायालयात योग्य न्याय मिळाला नाही तर आमदार, खासदारांचे जनतेने राजीनामे घेऊन पदावरून खाली खेचावे. त्यास जबाबदार म्हणून त्यांना घरातून बाहेर पडू देऊ नका, असे खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले. मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते व राजकारणात वयाने मोठी असणारी मराठा आरक्षणासंदर्भात एक अक्षरही बोलत नाहीत. ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे, अशी टिप्पण्णीही खासदार भोसले यांनी केली.

पाटण येथील तहसील कार्यालयासमोर 10 फेब्रुवारीपासून मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरू होते. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता तात्पुरते स्थगित केले आहे. खासदार भोसले यांच्या हस्ते उपोषण सोडण्यात आले. यावेळी माजी सभापती सुनील काटकर, विक्रमबाबा पाटणकर, रवी पाटील, पवन तिकुडवे, नितीन सत्रे, शंकरराव मोहिते, यशवंत जगताप आदी उपस्थित होते. 

मराठा समाजातील आमदार व खासदारांप्रमाणे इतर समाजातील आमदार खासदारांनी मराठा आरक्षणाच्या लढ्याला पाठिंबा दिला पाहिजे. कारण त्यांना मराठा समाजही मतदान देत असतो, असे स्पष्ट करून उदयनराजे म्हणाले, "न्यायालय काय निकाल देतेय हे पाहावे लागेल. न्याय देवतेला माझी कळकळीची विनंती आहे, की मराठ्यांवर अन्याय होऊ नये.

मात्र, निकाल विरोधात गेला तर उद्रेक होणारच. मराठा आरक्षणासंदर्भातील एका बैठकीत मी प्रश्न विचारायला गेलो तर अशोक चव्हाणांना एवढी घाई होती, की त्यावर आपण पुन्हा बोलू, असे सांगून टाळले. त्यामुळे आम्हाला जी भूमिका मांडायची होती. त्याचे रेकॉर्ड झाले नाही.'' आंदोलनकर्ते पवन तिकुडवे यांना लिंबू पाणी देऊन आंदोलन स्थगित केल्याचे खासदार भोसले यांनी जाहीर केले. तहसीलदार योगोश्वर टोपे यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले. या वेळी लॉकडाऊन करू नये, याबाबत व्यापाऱ्यांनी खासदार भोसले यांना निवेदन दिले. 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख