ही मागणी यापूर्वी कोणी का केली नाही....उदयनराजेंच्या मागणीवर थोरातांचा सवाल  - Why no one has made this demand before .... Thorat's question on Udayan Raje's demand | Politics Marathi News - Sarkarnama

ही मागणी यापूर्वी कोणी का केली नाही....उदयनराजेंच्या मागणीवर थोरातांचा सवाल 

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 2 मार्च 2021

ही मागणी रास्त असून, यापूर्वी ही मागणी कोणी का केली नाही, याबाबत थोरात यांनी आश्‍चर्य व्यक्‍त करत नवीन इमारतीच्या कामास मान्यता देण्याची कार्यवाही करण्याचे आश्‍वासन दिले. याचदरम्यान उदयनराजेंनी पालिकेच्या एसटीपी प्लॅंटसाठी शासकीय जागेची मागणी केली. त्यानुसार त्यास थोरात यांनी मान्यता दिली. 

सातारा : सातारा तहसील आणि प्रांताधिकारी कार्यालयासाठी नवीन इमारत उभारणे आवश्‍यक असून, त्याबाबतचा दिलेला प्रस्ताव तत्काळ मंजूर करून त्यासाठी निधी देण्याची मागणी आज खासदार उदयनराजे भोसले यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली. 

मुंबई येथे आज उदयनराजेंनी मंत्री थोरात यांची भेट घेतली. भेटीदरम्यान उदयनराजे म्हणाले, "सातारा तहसील आणि प्रांताधिकारी कार्यालय ब्रिटिशकालीन इमारतीत सुरू आहे. याच परिसरात वन विभागाचे कार्यालयही होते, मात्र ते आता इतरत्र नेण्यात आले आहे. दिवसेंदिवस या ठिकाणच्या कामकाजावर ताण येत असून उपलब्ध इमारत, जागा कमी पडत आहे.

या दोन कार्यालयांबरोबरच मुद्रांक शुल्क नोंदणी कार्यालय, निवडणूक शाखा, सेतू, नगरभूमापन व इतर कार्यालयेही याच परिसरात आहेत. या कार्यालयात दररोज हजारो नागरिक येतात. नागरिक, कर्मचारी व अपुऱ्या कार्यालयांमुळे या ठिकाणाला कोंडवाड्याचे रूप आले आहे. त्यासाठी या ठिकाणी बहुमजली इमारत उभारणे आवश्‍यक असून, त्यासाठीचा प्रस्ताव दिलेला आहे.

हा प्रस्ताव मंजूर करत निधी तरतुदीची मागणी केली.'' ही मागणी रास्त असून, यापूर्वी ही मागणी कोणी का केली नाही, याबाबत थोरात यांनी आश्‍चर्य व्यक्‍त करत नवीन इमारतीच्या कामास मान्यता देण्याची कार्यवाही करण्याचे आश्‍वासन दिले. याचदरम्यान उदयनराजेंनी पालिकेच्या एसटीपी प्लॅंटसाठी शासकीय जागेची मागणी केली. त्यानुसार त्यास थोरात यांनी मान्यता दिली. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख