कोण म्हणतंय मला ईडीची भिती वाटते..... - Who says I'm scared of ED says NCP Minister Jayant Patil | Politics Marathi News - Sarkarnama

कोण म्हणतंय मला ईडीची भिती वाटते.....

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 16 जुलै 2021

राजकिय क्षेत्रातील लोकांच्या मागे चौकशा लावून त्यांना नामोहरण करण्याचे प्रयत्न यातून होत आहेत. ईडीची नोटीस आली की त्याला प्रसिध्दी दिली जाते.

सातारा : मला ईडीची भिती वाट्ण्याचा प्रश्नच नाही. नोटीस आलेले लोकही घाबरलेत असा गैरसमज करून घेऊ नका. लोकांना घाबरवण्यासाठीच ईडीचा वापर केला जात आहे. राजकिय क्षेत्रातील लोकांच्या मागे लागून त्यांना नामोहरण करण्याचा प्रयत्न यातून होत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. Who says I'm scared of ED says NCP Minister Jayant Patil

मंत्री जयंत पाटील आज साताऱ्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला भेट देऊन ईडीच्या चौकशीविषयीची अधिक माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ईडीच्या कारवाईतून सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न होत आहे का, त्यातूनच राष्ट्रवादी बॅकफूटवर असल्याचे विरोधकांतून बोलले जात आहे, याविषयी विचारले असता मंत्री पाटील म्हणाले, राष्ट्रवादी बॅकफूटवर नाही, पण जाणीवपूर्वक खोटे नाटे आरोप करून राष्ट्रवादीच्या नेत्यांना अडचणीत आणून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. हे महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात येत आहे.

हेही वाचा : मोदी-शहा कर्नाटकातही उत्तराखंड पॅटर्न राबवणार? येडियुरप्पा थेट दिल्लीत दाखल

राष्ट्रवादी बॅकफूटवर जाण्याचा प्रश्नच उद्धभवत नाही.  ईडीने मालमत्ता अनिल देशमखांची जप्त केली आहे. वेगवेगळ्या प्रकरणातून ईडीचा वापर केला जात आहे, याविषयी विचारले असता मंत्री पाटील म्हणाले, महाराष्ट्रातील सरकारमधील मंत्र्यांना अडचणीत आणून त्यांच्यावर सीबीआय, ईडीच्या माध्यमातून चौकशीचा ससेमिरा लावायचा. सरकारला पडण्यासाठी जे जे शक्य आहे ते ते करायचे असा कार्यक्रम त्यांनी ठरविल्याचा दिसतो. आमचे कोणतेही सहकारी दोषी दिसत नाहीत. ईडीने सीबअीयने चौकशी केलेली आहे.त्याचा तपशील सोयीस्करपणे जाहीर केला जात आहे. त्यातील सर्व तपशील बाहेर आला तर त्यातून नेमकी परिस्थिती दिसून येईल. 

आवश्य वाचा : अजितदादांच्या मिश्किल टिपण्णीमुळे उपस्थितांना हसू आवरता आले नाही!

दहा दहा, पंधरा वर्षांपूर्वीच्या गोष्टींचा आजच्या परिस्थितीत किंमत लावून आरोप केला जात आहे. अनिल देशमुखांच्या केसमध्ये काही वर्षापूर्वी त्यांनी कुठे तरी जमीन घेतली असेल तिची किंमत आजच्या घडीने वाढवून लावायची, व खोटे आरोप केले जात आहेत. हे सर्व धादांत खोटे आहे. याचा करता करविता कोण आहे, ते जनतेच्या लक्षात आले आहे. महाराष्ट्रातील सत्ता मिळविण्यासाठीच त्यांचा हा प्रयत्न आहे. 

जितेंद्र आव्हाडा बद्दल विचारले असता ते म्हणाले, त्यांच्याविषयी तक्रार असेल तर त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला हवी. त्यांनी चर्चा केल्यानंतर समजूती गैरसमजूती दूर झाल्या तर ठिक आहे. आमचे तीन पक्षाच्या सरकारमध्ये अशा छोट्यामोठ्या गोष्टी आम्हाला महत्वाच्या वाटत नाहीत. तिनही पक्ष एकसंघपणे राज्य चालवत आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या समाधानाला उतरलेले हे सरकार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. 

विधान परिषदेच्या १२ सदस्यांच्या निवडीची प्रक्रिया कुठपर्यंत आली आहे, या प्रश्नावर ते म्हणाले, आमच्या बाजूने सर्व प्रक्रिया करून आम्ही यादी राज्यपालांकडे पाठविली आहे. आता प्रश्न राज्यपालांकडे प्रलंबित आहे. महाराष्ट्रात अशा पध्दतीचा प्रश्न यापूर्वी कधीही आलेला नाही. विलंब का लागतोय, हा प्रश्न असून राज्य सरकारला यासाठी शिफारशी करण्याचा अधिकार आहे. त्या अधिकारावर गदा येतेय का असा प्रश्न आहे. राज्य सरकारने राज्यपालांना आठवण करून दिलेली आहे.

विलंब लावणे हे आदर्श आणि ज्येष्ठ राज्यपालांना कितपत मान्य आहे, हे सगळ राज्याच्या जनतेच्या लक्षात येत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. नवीन सहकार मंत्र्यांचे तुम्ही अभिनंदन केले का,  यावर जयंत पाटील म्हणाले, माझा त्यांचा फारसा परिचय नाही. त्यामुळे मी हवेत अभिनंदन कसे करायचे. भेट झाली, ओळख झाली तर बोलू. पण, त्यांनी काश्मिरमध्ये ३७० वे कलम काढून टाकले तसेच सहकारातील रिझर्व्ह बँकेने सहकारी बँकांवरील नवे निर्देश जारी केले आहेत. हे निर्बंध हटवून ते राज्यातील सहकाराला मुक्तपणे वाढण्याची संधी देतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

तुम्हाला ईडीची भिती वाटते का, या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले, भिती वाटण्याचा प्रश्न नाही, मुळात नोटीस आलेले घाबरले आहेत, असा गैरसमज करून घेऊ नका,..लोकांना घाबरवण्यासाठी ईडीचा वापर केला जात आहे. राजकिय क्षेत्रातील लोकांच्या मागे चौकशा लावून त्यांना नामोहरण करण्याचे प्रयत्न यातून होत आहेत. ईडीची नोटीस आली की त्याला प्रसिध्दी दिली जाते. त्यातून ईडीचे लोकच वेगवेगळ्या बातम्या पेरतात. त्या व्यक्तीला बदनाम करण्याचा प्रयत्न होतो. त्याला ही तोंड द्यावे लागते, असे त्यांनी स्पष्ट केले. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख