आमदार शिंदे मराठा आहेत का ते तपासले पाहिजे : नरेंद्र पाटील - We should check whether MLA Shinde is a Maratha: Narendra Patil | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार शिंदे मराठा आहेत का ते तपासले पाहिजे : नरेंद्र पाटील

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 7 मे 2021

मराठ्यांबरोबरच इतर राज्यातील जातींच्या आरक्षणाचे सुध्दा प्रश्‍न आहेत, ते प्रश्‍न काही दहा मिनिटात निकाली निघणार आहेत का, आणि हे चालले दिल्लीला अशी टीकाही श्री. पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर केली. 

सातारा : आमदार शशीकांत शिंदे (Shashikant Shinde) मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) बाजूने आहेत का, हे त्यांनाच माहित, पण ते मराठा आहेत का, ते तपासले पाहिजे, असा प्रश्न माजी आमदार नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी आज साताऱ्यातील पत्रकार परिषदेत उपस्थित केला. राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक करणाऱ्या त्या युवकांच्या जीवाला धोका असून त्यांना पोलिस संरक्षण देण्यात यावे, तसेच त्या युवकांना धमकावल्याप्रकरणी आमदार शिंदेंच्या विरोधात तक्रार नोंदविण्यात यावी. यापुढे कोणी मराठा समाजातील युवकांना धमकावण्याचा प्रयत्न करु नये, असा इशाराही श्री. पाटील यांनी दिला आहे. (We should check whether MLA Shinde is a Maratha: Narendra Patil)

मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक करणाऱ्या युवकांना आमदार शशीकांत शिंदे यांनी धमकावले होते. या युवकांना माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी पाठींबा दिला असून त्या युवकांच्या जीवाला धोका असून त्यांना पोलिस संरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली. तसेच पोलिसांनी संरक्षण देतानाच त्या युवकांच्या कुटुंबियांची तक्रार नोंदवून घ्यावी. त्यांनी तक्रार न दिल्यास पोलिसांनी पुढाकार घेत स्वत: आमदार शिंदे यांच्याविरोधात तक्रार नोंदवावी, अशी मागणी ही त्यांनी केली. 

हेही वाचा : मराठ्यांनो आंदोलन करण्यापेक्षा आमदार, खासदारांना घराबाहेर पडू देऊ नका

आमदार शशीकांत शिंदे हे मराठा आरक्षणाच्या बाजूने आहेत का, या प्रश्नाला उत्तर देताना नरेंद्र पाटील म्हणाले, ते त्यांनाच माहित. पण ते मराठा आहेत का, ते तपासले पाहिजे, असा सवाल करत आम्ही प्रत्येकाच्या सोबत आहोत. विरोध आणि संघर्षाची भीती मला कधी वाटली नाही आणि ते खासदारकीच्या निवडणूकीत तुम्ही पाहिलेय. त्यामुळे यापुढे कोणी समाजातील युवकांना धमकावण्याचा प्रयत्न करु नये, असा इशाराही पाटील यांनी देत कालच्या घटनेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कोणताही सहभाग नसल्याचे स्पष्ट केले. 

हेही वाचा : परळीकरांसाठी धनंजय मुंडेच्या संकल्पनेतून सेवाधर्म - सारं काही समष्टीसाठी

दगडफेक करणाऱ्यांची माहिती मिळाल्यानंतर आमदार शशिकांत शिंदे हे पोलिसांअगोदर त्या युवकांच्या घरी गेले. त्याचे व्हिडिओ व्हायरल झालेत. त्यात ते धमकावत असल्याचे दिसत आहे. पोलिसांनी त्या युवकांना संरक्षण देत त्यांची तक्रार नोंदवून घ्यावी. आम्ही त्यांच्यासोबत असून त्यांच्या केसाला धक्का लागला तर मराठ्यांचा उद्रेक काय असतो, ते धमकावणाऱ्यांना दाखवून देऊ, असा इशाराही श्री. पाटील यांनी यावेळी दिला. 

नरेंद्र पाटील म्हणाले, केंद्र शासनाच्या 102 व्या घटनादुरुस्तीच्या अनुषंगाने राज्य सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत आहे. ज्यावेळी हि घटनादुरुस्ती झाली त्यावेळी आत्ताचे सत्ताधारी मुग गिळून का गप्प बसले होते. त्याच घटनादुरुस्तीच्या आधारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण देवू केले होते. त्यावेळी आत्ता सतेत असणारी राष्ट्रवादी, राष्ट्रीय कॉंग्रेस विरोधात होती, त्यावेळी त्यांना का विरोध केला नाही.

विरोधात असताना एक बोलायचे आणि सत्तेत आल्यावर दुसरे बोलायचे, हे त्यांचे धोरण आहे. मराठा आरक्षण हा आपल्या राज्यापुरता विषय आहे. त्यासाठी आम्ही पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना हात जोडून विनंती करणार, त्यांची भेट घेणार असे, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणत आहेत. केव्हा भेटायला जाणार, तुम्ही मातोश्री सोडून बाहेर पडत नाहीत.

बाहेर न जाता ते वर्षा बंगल्यावर इतरांशी बैठका घेता, कधी मंत्रालयात गेलाय का, मंत्रीमंडळाची बैठक बोलावलीय का, अशा शब्दात पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर टिका केली. मराठ्यांबरोबरच इतर राज्यातील जातींच्या आरक्षणाचे सुध्दा प्रश्‍न आहेत, ते प्रश्‍न काही दहा मिनिटात निकाली निघणार आहेत का, आणि हे चालले दिल्लीला अशी टीकाही श्री. पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर केली. 

अजितदादा का बदलले... 
अजितदादा धडाडीचे नेते आहेत. मला त्यांच्याविषयी आदर असून ते उपमुख्यमंत्री झाल्यावर का बदलले हे मला समजत नाही. विरोधात होते त्यावेळी आरक्षणाच्या विषयावर ते प्रत्येकवेळी माझ्याशी बोलायचे. आता ते काही बोलत नाहीत. त्यांनी सारथी संस्था बंद पाडली, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळास दोन वर्षात एक रुपयाही दिला नसल्याचा आरोप करत पाटील यांनी अजितदादांवर टिका करत महाविकास आघाडी सरकार स्वत:च्या कर्माने पडेल, असे वक्‍तव्य केले.  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख