ध्येयवादी, पुरोगामी, प्रगतशील नेतृत्वं काळाच्या पडद्याआड : अजित पवार - Vilaskaka will always be remembered as a leader who made a valuable contribution to the rural development of Maharashtra Says DyCM Ajit pawar | Politics Marathi News - Sarkarnama

ध्येयवादी, पुरोगामी, प्रगतशील नेतृत्वं काळाच्या पडद्याआड : अजित पवार

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 4 जानेवारी 2021

महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासात मोलाचं योगदान देणारं नेतृत्वं म्हणून विलासकाका सदैव स्मरणात राहतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

सातारा : सहकाराच्या माध्यमातून ग्रामविकासाला वाहून घेतलेलं ध्येयवादी, पुरोगामी, प्रगतशील नेतृत्वं आज काळाच्या पडद्याआड गेलं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या माजी आमदार विलासराव पाटील उंडाळकर यांच्याविषयी शोकभावना व्यक्त केल्या. 

ज्येष्ठ काँग्रेस नेते व राज्याचे माजी सहकारमंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले त्यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, विलासकाकांनी १९८० ते २०१४ अशी सलग ३५ वर्षे दक्षिण कराड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्वं केलं.

सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य, शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, राज्य मंत्रिमंडळात विविध महत्वाच्या खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी केलेले कार्य सदैव स्मरणात राहिल.विलासकाकांनी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून जलसंधारणाच्या क्षेत्रात केलेले कार्य, डोंगरी विकास निधीची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी दाखवलेली दूरदृष्टी त्यांचं वेगळेपण दाखवणारी आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासात मोलाचं योगदान देणारं नेतृत्वं म्हणून विलासकाका सदैव स्मरणात राहतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख