स्वातंत्र्यसंग्राम सैनिक अधिवेधनातून विलासकाकांनी तरूणांना देश सेवेची प्रेरणा दिली : प्रतिभाताई पाटील  - Vilaskaka inspire youth to serve the country through freedom fighter convention: Pratibhatai Patil | Politics Marathi News - Sarkarnama

स्वातंत्र्यसंग्राम सैनिक अधिवेधनातून विलासकाकांनी तरूणांना देश सेवेची प्रेरणा दिली : प्रतिभाताई पाटील 

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 4 जानेवारी 2021

स्वातंत्र्यसंग्राम सैनिक अधिवेशन घेण्याचा स्तुत्य उपक्रम सुरू केला. हे फार आवश्यक व योग्य आहे. मी राष्ट्रपती असताना त्यांच्या निमंत्रणावरून अशाच एका कार्यक्रमात सहभागी झाले होते, याचा मला आनंद आहे. 

सातारा : स्वातंत्र्यसैनिकाचे सुपूत्र असल्यामुळे ध्येयाने व प्रामाणिकपणाने वागणे,  आपल्या कार्यावर निष्ठा ठेवून सेवा करणे- हे गुण विलासराव पाटील उंडाळकर यांच्यात उपजतच आले होते. विलासकाकांनी नव्या पिढीत स्वातंत्र्य संग्रामाच्या आठवणी कायम  राहाव्यात व त्यातून देशाची सेवा करण्याची प्रेरणा तरुणांना मिळावी, यासाठी स्वातंत्र्यसंग्राम सैनिक अधिवेशन घेण्याचा स्तुत्य उपक्रम सुरू केला, अशी आठवण माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी विलासकाका उंडाळकर यांना श्रध्दांजली वाहताना सांगितली.  

प्रतिभाताई पाटील म्हणाल्या, १९४७ मध्ये स्वतंत्र झालेल्या भारत देशातील जनतेने स्वतःला दिलेल्या राज्यघटनेची अंमलबजावणी १९५० मध्ये झाली. घटनेनुसार पहिल्या निवडणुका १९५२ मध्ये झाल्या. या निवडणुकीत केंद्रात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या व मुंबई राज्यात मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाची सरकारे सत्तेवर आली.
 
स्वातंत्र्यानंतरचा हा काळच ज्याला भारलेला व मंतरलेला म्हणता येईल, अशा स्वरूपाचा होता. गांधी हत्या, तेलंगणामधील डाव्यांचा उठाव, सरदार वल्लभभाई पटेल यांचे निधन हे धक्के पचवून समाज नेहरूंच्या नेतृत्वाखाली देशाची उभारणी करण्यास सज्ज झाला होता. पंचवार्षिक  योजनांच्या माध्यमातून विकासाचे नवे प्रयोग सुरू झाले होते.

पण इतिहास सरळ गतीने चालत नसतो. काँग्रेसनेच स्वीकारलेल्या भाषावार प्रांतरचनेच्या तत्त्वाची अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी वेगवेगळ्या भाषिक समूहांकडून होऊ लागली. त्याला महाराष्ट्राचा अपवाद असण्याचे कारण नव्हते. या मागणीला व्यापक आंदोलनाची दिशा मिळाली. 

सुरुवातीच्या काळात विलासकाकांनी नदीजोड प्रकल्पाद्वारे कराड दक्षिणेतील २२०० हेक्टर जमिनीला पाणी मिळवून दिले. त्यांच्याच प्रयत्नांमुळे त्यासाठी २५ कोटी  रुपये सुद्धा मिळाले. तसेच डोंगरी विभागात जलसंधारणाच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणात पाणी अडविण्याचा उपक्रमदेखील राबविला. यातच त्यांची विकासाची तळमळ दिसली. ही फार स्तुत्य बाब असून एक जागरूक प्रतिनिधी  असल्याचा पुरावाच आहे. 

एका स्वातंत्र्यसैनिकाचे पुत्र असल्यामुळे ध्येयाने व प्रामाणिकपणाने वागणे, 
आपल्या कार्यावर निष्ठा ठेवून सेवा करणे- हे गुण त्याच्यात उपजतच
 आले. विलासकाकांनी नव्या पिढीत स्वातंत्र्यसंग्रामाच्या आठवणी कायम 
राहाव्यात व त्यातून देशाची सेवा करण्याची प्रेरणा तरुणांना मिळावी, यासाठी स्वातंत्र्यसंग्राम सैनिक अधिवेशन घेण्याचा स्तुत्य उपक्रम सुरू केला. हे फार आवश्यक व योग्य आहे. मी राष्ट्रपती असताना त्यांच्या निमंत्रणावरून अशाच एका कार्यक्रमात सहभागी झाले होते, याचा मला आनंद आहे. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख