सातारा : भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज सायंकाळी कृष्णकुंजवर जाऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी श्री. ठाकरे यांना राजमुद्रा भेट दिली. मराठा आरक्षण व राज्यातील राजकिय परिस्थितीवर दोन्ही नेत्यांनी तासभर चर्चा केली. या भेटीमुळे राजकिय वर्तूळात चर्चेला उधाण आले आहे.
राज ठाकरे यांच्याशी चर्चेनंतर उदयनराजे म्हणाले, आज आमची कोणतीही पक्षीय पातळीवरील किंवा राजकीय चर्चा झाली नाही. मात्र, मराठा आरक्षणावर चर्चा केल्याचं त्यांनी सांगितले. उदयनराजे म्हणाले, मागे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली होती. मराठा आरक्षणाच्या प्रश्नात कोणीही राजकारण आणू नये असं त्यांना सांगितलं होतं.
कोणाच्या आरक्षणावर गदा देखील येऊ नये. इतर समाजातील लोकांना जसा न्याय मिळाला तसा मराठा समाजातील लोकांना देखील भेटायला हवा. शिवाजी महाराजांचा विचार जपायला हवा, नाहीतर देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही, असेही उदयनराजे म्हणाले. तसेच उद्या (रविवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका बैठकीचं आयोजन केले आहे. त्यानुषंगानेही चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी उदयनराजेंनी राज ठाकरे यांना राजमुद्रा भेट दिली. तसेच मामाच्या मुलाच्या लग्न सोहळ्याचे निमंत्रण दिले. त्यानंतर राज ठाकरे यांनीही उदयनराजेंच शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी उदयनराजेंसमवेत जितेंद्र खानविलकर, काकासाहेब धुमाळ उपस्थित होते.

