पुणेकरांसारखी सातारकरांनाही टोलनाक्यांवर सूट द्या : उदयनराजे - Udayan Raje says give Satarkars a discount on toll plazas | Politics Marathi News - Sarkarnama

पुणेकरांसारखी सातारकरांनाही टोलनाक्यांवर सूट द्या : उदयनराजे

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 27 फेब्रुवारी 2021

रस्त्याची कामे होत नाही तोपर्यंत टोल बंद करण्याचा निर्णय घ्यावा, असेही ते म्हणाले. या प्रश्‍नासंदर्भात रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांची लवकरच भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 
 

सातारा : पुणे जिल्ह्यात ज्याप्रमाणे खेड-शिवापूर येथील टोलला माफी दिली आहे. त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यातील नागरीकांना आनेवाडी व तासवडे टोलनाक्‍यांवर सूट द्यावी, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. त्याचबरोबर सातारा-पुणे रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्यांवरही कडक कारवाई करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 

जिल्ह्यातील विविध प्रश्‍नांसदर्भात उदयनराजे यांनी नुकतीच जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, "पुणे जिल्ह्यातील एमएच 12 व एमएच 14 क्रमांकाच्या वाहनांना खेड-शिवापूर टोलनाक्‍यावर सूट देण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातही दोन टोलनाके आहेत. पुण्याप्रमाणेच साताऱ्यातील एमएच 11 व एमएच 50 पासिंग असलेल्या वाहनांना आनेवाडी व तासवडे टोलनाक्‍यावर टोल माफी मिळणे आवश्‍यक आहे.'' 

सातारा - पुणे रस्त्याच्या दर्जाबाबतही उदयनराजे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, "रिलायन्स कंपनीला ठेक्‍याचे पैसे मिळाले आहेत. त्यानंतर त्यांनी उपठेकेदार नेमले. परंतु त्यांनी चांगले काम करणाऱ्यांना काम द्यायला पाहिजे होते. त्यामध्ये अनेकांना कामाची तांत्रिक माहिती नाही. अनेक जण बांधकाम विभागाच्या काळ्या यादीत आहेत. परंतु राजकीय हस्तक्षेपातून त्यांना कामे मिळाली आहेत. त्यामुळे रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे.

खंबाटकी घाटातील 'एस' वळणावर शेकडो लोकांनी आपले जीव गमविले आहेत. प्रशासन अजून कशाची वाट पाहतेय, असा प्रश्न उपस्थित करून ते म्हणाले, ठेकेदार व्यवस्थित काम करतो, की नाही हे पाहण्याची जबाबदारी राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळ व जिल्हा प्रशासनाची आहे. परंतु ते ती योग्यप्रमाणे पार पाडत नाहीत. त्यामुळे रस्त्याची कामे होत नाही तोपर्यंत टोल बंद करण्याचा निर्णय घ्यावा, असेही ते म्हणाले. या प्रश्‍नासंदर्भात रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांची लवकरच भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

पोलिसांचा धाकच नाही...

राजवाडा परिसरात  झालेल्या कोयता हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर उदयनराजे यांनी आज पोलिसांच्या कार्यक्षमतेवर तोफ डागली. ते म्हणाले, "सातारा शहराच्या मुख्य ठिकाणी एखाद्यावर वार होणे ही गंभीर गोष्ट आहे; परंतु पोलिसांनी ती गांभीर्याने घेतलेली नाही. यातील संशयितावर तातडीने कारवाई करणे आवश्‍यक होते; परंतु पोलिसांवर राजकीय दबाव आहे.'' राजकीय दबाव पोलिस घेत असल्यानेच गुन्हेगारी वाढत चालली आहे. पोलिसांचा धाकच उरलेला नाही.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख