ग्रामपंचायतीत भाजपचे अडीच हजार कायकर्ते निवडून येणार : गिरिश बापट - Two and a half thousand BJP workers will be elected in Gram Panchayat says MP Girish Bapat | Politics Marathi News - Sarkarnama

ग्रामपंचायतीत भाजपचे अडीच हजार कायकर्ते निवडून येणार : गिरिश बापट

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 10 जानेवारी 2021

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळेल. बारिकसारीक त्रुटी राहू नयेत. संघटन चांगले वाढावे, म्हणून माझा आजचा दौरा असल्याचे सांगून श्री. बापट म्हणाले, देश पातळीवर भाजप ग्रामपंचायतीसाठी कृषी व ग्रामविकास विभागाच्यावतीने राबवित असलेल्या योजनांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सातारा : ग्रामपंचायत निवडणूकीत भाजप ताकदीने उतरली असून अनेक ठिकाणी आमचे सदस्य बिनविरोध झालेले आहेत. सध्या तीन हजार कार्यकर्ते निवडणूक रिंगणात आहेत. साधारण अडीच हजार कार्यकर्ते यावेळेस निवडून येतील, त्यामुळे भाजपला चांगले यश मिळेल, असा विश्‍वास खासदार गिरिश बापट यांनी व्यक्त केला. 

जिल्हा संपर्क नेते म्हणून खासदार गिरिश बापट यांनी आज साताऱ्यात येऊन तालुकानिहाय ग्रामपंचायत निवडणुकीचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. श्री. बापट म्हणाले, सातारा जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकीत भाजप प्रभावीपणे उतरली असून अनेक ठिकाणी आमचे सदस्य बिनविरोध झाले आहेत.

आम्ही सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला हे मी मानत नाही. यावेळेस आम्ही ताकदीने उरलो आहोत. जिल्ह्यातील एकुण 876 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून 555 ठिकाणी भाजपने पॅनेल उभे केलेले आहे. तीन हजार कार्यकर्ते निवडणूक रिंगणात असून आमचे 66 ठिकाणी भाजपचे पॅनेल बिनविरोध निवडून आलेले आहे. प्राथमिक अंदाज पाहता अडीच हजार कार्यकर्ते ग्रामपंचायत निवडणूकीत निवडून येतील, असा अंदाज आहे.

गावपातळीवर पक्षिय लढती होत नाहीत. पण आतापर्यंत झालेल्या निवडणूकीत साडे तीनशे भाजपचे सरपंच झालेले आहेत. यावेळेस ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळेल. बारिकसारीक त्रुटी राहू नयेत. संघटन चांगले वाढावे, म्हणून माझा आजचा दौरा असल्याचे सांगून श्री. बापट म्हणाले, देश पातळीवर भाजप ग्रामपंचायतीसाठी कृषी व ग्रामविकास विभागाच्यावतीने राबवित असलेल्या योजनांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

थेट पैसे ग्रामपंचायतींना मिळत आहे. सगळा पैसा थेट ग्रामपंचायतींना देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. स्थानिक पातळीवर पहिली प्रक्रिया लोकशाहीची होती, त्यांना चांगली संधी विकासासाठी दिली पाहिजे हा हेतू आहे. केंद्राने महात्मा गांधींची योजना चला खेड्याकडे...रोजगार निर्मिती असे विविध व्यवसाय, शेतीपूरक व्यवसाय, स्वयंरोजगार, मनरेगा यातून गाव स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने करत आहे.  अनेक ग्रामपंचायतींनी त्याचा लाभ घेतलेला आहे. त्यामुळे लोकांना माहिती आहे, हे कोणामुळे झाले आहे. त्यामुळे या माध्यमातून मतांचा चांगला बेस भारतीय जनता पक्षाचा तयार झालेला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. 

काकांची माझी जुनी मैत्री... 
विलासकाकांच्या घरी जाऊन मी त्यांना आदरांजली वाहणार आहे. काकांची आणि माझी जुनी मैत्री असून आम्ही दोघांनी खूप काळ एकत्र काम केलेले आहे, असे सांगून खासदार गिरिश बापट म्हणाले, रोज आम्ही एकत्र बसत होतो. खासदार झाल्यानंतर साताऱ्यात आल्यावर त्यांची भेट होत असे. 1995 पासून मी साताऱ्यात येत आहे. येथील सातशे गावात मी जाऊन आलेलो असून जिल्ह्यातील प्रश्‍न व राजकारणही मला माहिती आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

उदयनराजेंची घेतली सदिच्छा भेट 
खासदार गिरिश बापट यांनी आज खासदार उदयनराजे भोसले यांची त्यांच्या जलमंदीर पॅलेस या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी पत्रकारांनी त्यांना विचारले असता, ते म्हणाले, सामान्य माणसाशी नाळ व सामान्य माणसांवर प्रेम अशा अनेक गुणांपैकी या उदयनराजेंच्या गुणांमुळे ते माझे अगदी जवळचे मित्र आहेत. म्हणून मी त्यांना भेटण्यासाठी येथे आलो आहे, असे त्यांनी सांगितले. 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख