चिपळूणला मुसळधार पाऊस; पुराचे दोन बळी, संपर्क यंत्रणा ठप्प - Torrential rain to Chiplun; Two flood victims, communication system jammed | Politics Marathi News - Sarkarnama

चिपळूणला मुसळधार पाऊस; पुराचे दोन बळी, संपर्क यंत्रणा ठप्प

मुझफ्फर खान
गुरुवार, 22 जुलै 2021

चिपळूण पालिका आणि अपरांत रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने खेडेकर क्रीडा संकुल येथे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. त्यात एकवीस रुग्ण आहेत येथील ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाला आहे त्यामुळे रुग्णांचे जीव धोक्यात आहे.

चिपळूण : चिपळूण शहरात पावसाचा जोर असल्याने पूरपरिस्थिती कायम आहे. पाण्याची पातळी वाढत आहे. मुसळधार पावसामुळे शहरात दोन बळी गेल्याची प्राथमिक माहिती आहे. एक महिला पाण्यात बुडाली असून दुसरी वाहून गेल्याची भिती व्यक्त होत आहे. एकविरा मंदिर परिसरात राहणाऱ्या एका कुटूंबाला पुराच्या पाण्यातून बाहेर काढताना एका वयोवृध्द महिलेचा पाण्यात बुडून मृत्यु झाल्याची प्राथमिक माहिती आहे. Torrential rain to Chiplun; Two flood victims, communication system jammed

संबंधित माहिला सदनिकेत एकटी राहत होती. पाणी वाढत असताना तिला अंदाज आला नाही. सदनिकेत पाणी वाढल्यानंतर जीव वाचवण्यासाठी ती घराबाहेर पडली तेव्हा पाण्यात बुडून तिचा मृत्यु झाला. संबंधित माहिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. बेंदरकर आळी येथील एक माहिला पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे. पुराचा सामना करण्यासाठी चिपळूण नगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा पावसाळ्यापूर्वी सज्ज होती. तीन बोटी, लाईफ जॅकेट, दोरखंड बोये आणि इतर सामग्री आपत्कालीन यंत्रणेत समावेश होता. सदरची यंत्रणाही इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या परिसरातील अग्निशमन केंद्रात ठेवण्यात आली होती.

हेही वाचा : राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पुन्हा लिहिले पत्र...

अग्निशमन केंद्रही पाण्याखाली गेल्यामुळे पालिकेची आपत्कालीन यंत्रणा नाही पुराच्या पाण्यात अडकले आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांचे फोन लागत नाहीत. पालिका परिसरही पाण्यात गेला आहे. त्यामुळे पालिकेतील अधिकारी चिपळूण पोलिस ठाण्यात आले आहेत. पोलिस ठाण्यातून शक्य होईल तेवढे मदत कार्य सुरू आहे. मुरादपुर पेठमाप मजरेकाशी शंकरवाडी देसाई मुल्ला महाराष्ट्र हायस्कूल परिसर दादरकर मोहल्ला येथील बैठ्या घरांच्या छतापर्यंत पाणी गेले आहे. अनेक कुटुंबे अपार्टमेंटच्या छतावर जीव वाचवण्यासाठी गेली आहेत. 

आवश्य वाचा : राजीनाम्याची चर्चा सुरू असताना येडियुरप्पा म्हणाले, मोदी, शहा अन् नड्डांचे माझ्यावर विशेष प्रेम!

प्रत्येकाला मदत हवी परंतु संपर्क यंत्रणा गप्प झाल्याने आणि पाण्याच्या मोठ्या प्रवाहामुळे मदत कार्यास अडथळा निर्माण होत आहे. शहरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी खाजगी बोटींची मागणी करण्यात आली आहे. परंतु, पाण्याचा प्रवाह जोरात असल्यामुळे या पाण्यातून बोटी चालवणे शक्य नाही त्यामुळे खाजगी बोटी चालकांनी आपल्या बोटी पाण्यात घालण्यास नकार दिला

रूग्णांचा जीव धोक्यात...

चिपळूण पालिका आणि अपरांत रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने खेडेकर क्रीडा संकुल येथे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. त्यात एकवीस रुग्ण आहेत येथील ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाला आहे त्यामुळे रुग्णांचे जीव धोक्यात आहे. सेंटरच्या बाहेर उभी असलेली रुग्णवाहिका वाहून गेली आहे. कोविड सेंटरच्या चारही बाजूने पाणी असल्यामुळे आठ प्रवेश करणे शक्य नाही त्यामुळे रुग्णांना दुपारचे जेवण असो किंवा इतर मदत कार्य करण्यास अडथळे येत आहेत.

ढगफूटीमुळे चिपळूण जलमय...

रात्रभर झालेल्या ढगफुटीमुळे चिपळूण जलमय बनले आहे. पावसामुळे तालुक्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहरातील अनेक भागात पाणी साचले असून अंतर्गत मार्ग बंद झाले आहे. २००५ ची पुनरावृत्ती होते की काय अशी भीती नागरिकांना लागून राहिली आहे. 
शहरातील बाजारपेठ, खेर्डीमध्ये पाच फुटांपेक्षा जास्त पाणी शिरले आहे. दोन्ही बाजारपेठा पाण्याखाली आहे. शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. 

२६ जुलै २००५ला ढगफुटी झाल्यामुळे चिपळूण शहरात आणि खेर्डी बाजारपेठेत पाणी साचले होते. कोट्यवधीची हानी झाली होती. यावर्षीही तशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र हवामान खात्याने चार दिवस हाय अलर्ट राहण्याचा इशारा दिल्यामुळे आणि सकाळपासून मुसळधार पावसाला सुरवात झाल्याने व्यापाऱ्यानी नुकसान टाळण्यासाठी आवश्यक त्या उपायोजना केल्या होत्या. मुंबई- गोवा महामार्ग, कराड रोड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

मुंबई गोवा महामार्गावरील ब्रिटिशकालीन बहादूर शेख पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अनेक घरांमध्ये छपरापर्यंत पाणी आल्याने शेकडो लोक पाण्यात अडकले आहेत. चिपळूण शहरातील जुना बाजार पूल आणि नवा पूल हे पूर्ण पाण्याखाली गेले असून दिसेनासे झाले आहेत. रात्रभर मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने याशिवाय कुंभार्ली घाट माथ्यापासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने पाणी शहरात आले आहे. वाशिष्टी, शिवनदीला आलेल्या पुराच्या पाण्याची पातळी आणखी वाढत आहे.
शहरातील जुना बाजार पूल, बाजारपेठ, जुने बस स्टॅन्ड, चिंचनाका मार्कंडी, बेंदर्कर आळी, मुरादपूर रोड, एसटी स्टँड ,भोगाळे ,परशूराम नगर परिसरात पाणी वाढत आहे.

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख