माथाडींना सरकारने विचारात न घेतल्यानेच कामगारांवर उपासमारीची वेळ... - The time of starvation on the workers is due to the government not considering Mathadis .... | Politics Marathi News - Sarkarnama

माथाडींना सरकारने विचारात न घेतल्यानेच कामगारांवर उपासमारीची वेळ...

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 4 मे 2021

श्री. दरेकर म्हणाले," या प्रश्नी मी तसेच विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. शासन स्तरावर पाठपुरावा करून तुमच्या मागण्या मार्गी लावू.''

ढेबेवाडी : एखाद्या घटकाविषयी कायदा करताना किंवा निर्णय घेताना शासनाने संबंधित घटकाला विचारात घेण्याबरोबरच समन्वय ठेवण्याची गरज असते. मात्र, आता दुर्दैवाने माथाडींबाबत तसे न घडल्यानेच सध्याच्या बिकट परिस्थितीत माथाडी कामगारांवर उपासमारीची वेळ येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी आज केला. 

माथाडी कामगार व त्यांच्याशी संलग्न अन्य घटकांचा अत्यावश्‍यक सेवेत समावेश करून त्यांना विमा संरक्षण तसेच रेल्वे व बसने प्रवासाची परवानगी द्यावी, या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मुंबईतील रेल्वे स्थानकांसमोर काल (सोमवार) पासून माथाडी न्याय हक्क सप्ताह सुरू करण्यात आला आहे. आज श्री. दरेकर यांनी तेथे भेट दिली. माथाडी भवन येथे जावून त्यांनी माथाडी कामगार, व्यापारी, वाहतूकदार कृती समितीशीही संवाद साधला. 

श्री. दरेकर म्हणाले," या प्रश्नी मी तसेच विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. शासन स्तरावर पाठपुरावा करून तुमच्या मागण्या मार्गी लावू.'' माथाडी नेते नरेंद्र पाटील म्हणाले, "या मागण्यांचा शासनाने तत्काळ विचार न केल्यास आम्हाला माथाडी कामगार व व्यापारी यांच्या संयुक्त कृती समितीमार्फत नाईलाजास्तव बेमुदत आंदोलन करावे लागेल.'' 

यावेळी नीलेश वोरा, अमृतभाई जैन, भानुशाली, मयूर सोनी, शंकरशेठ पिंगळे, संजय पिंगळे, अशोक जैन, राजेंद्र नवघणे, जितेंद्र येवले, संभाजी बर्गे, श्‍याम धमाले, अनिल सपकाळ, कृष्णा पाटील, अंकलेश यादव, एकनाथ जाधव आदींनी अडचणी मांडल्या. माथाडी संघटनेचे चंद्रकांत पाटील, रविकांत पाटील, दिलीप खोंड आदी उपस्थित होते. जनसंपर्क अधिकारी पोपटराव देशमुख यांनी आभार मानले. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख