सत्ताधाऱ्यांनाच सरकार पडण्याची भीती वाटते : प्रवीण दरेकर यांचा टोला - They are afraid that the government will fall on their own Says BJP Leader Praveen Darekar | Politics Marathi News - Sarkarnama

सत्ताधाऱ्यांनाच सरकार पडण्याची भीती वाटते : प्रवीण दरेकर यांचा टोला

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 15 नोव्हेंबर 2020

थडगी उकरून काढण्याची भाषा शिवसेना नेते संजय राऊत करीत आहे, पण बोलायला फक्त त्यांनाच येते, असे त्यांनी समजू नये. सगळ्यांना बोलायला येते, मग थडगी काय आणि दुसरे काय, सर्वांचाच पर्दाफाश करता येईल. त्यामुळे कोणी आव्हान देण्याची भाषा करु नये, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले. 

मुंबई : राज्यातील सरकार पाडून दाखवा...,पाडून दाखवा...,असे सत्ताधारी नेते म्हणत आहेत. कारण त्यांना केवळ भीतीने ग्रासले आहे. म्हणजे त्यांनाच स्वत:ला सरकार पडणार असल्य़ाची सारखी भीती वाटत असावी, असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी लगावला आहे. 

''सरकार पाडतो, असे कोणीही म्हणत नाही,'' 'ऑपरेशन लोटस' हा शब्दही कोणी उच्चारत नाही. तरीही ऑपरेशन लोटसमुळे आम्हाला खरचटलेही नाही, असे सत्ताधारी सांगतात. भाजपने खरंच काही करायचे ठरवले तर खरचटणे सोडाच, पण रक्तबंबाळ व्हाल, असा इशाराही त्यांनी दिला. 

थडगी उकरून काढण्याची भाषा शिवसेना नेते संजय राऊत करीत आहे, पण बोलायला फक्त त्यांनाच येते, असे त्यांनी समजू नये. सगळ्यांना बोलायला येते, मग थडगी काय आणि दुसरे काय, सर्वांचाच पर्दाफाश करता येईल. त्यामुळे कोणी आव्हान देण्याची भाषा करु नये, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.  राऊत यांना प्रसारमाध्यमांशी बोलल्याशिवाय चैन पडत नाही, पोटशूळ बाहेर काढल्याशिवाय त्यांना समाधान मिळत नाही, अशी टीकाही दरेकर यांनी केली.

 सरकारने एक वर्ष पूर्ण केल्याबद्दल त्यांचे नेते स्वतःची पाठ थोटपून घेत आहेत. मात्र, वर्षभरात सरकारने भरीव असे काहीच केले नाही. सरकारने महाराष्ट्रातील शेतक-यांना दिलेला शब्द पाळला नाही, शेतकरी अतिवृष्टीने हैराण झाला आहे, कोकणात निर्सग वादळातील शेतक-यांना मदत नाही,

कामगार बेजार आहेत. बेरोजगारी मिटविण्यासाठी कंपन्यांशी करार करतात पण प्रत्यक्षात काही होत नाही, आजही कोविड नियंत्रणात आणू शकत नाही. मग वर्ष पूर्ण केल्याच्या गमजा मारण्याला काय अर्थ आहे, असेही दरेकर यांनी विचारले. सरकारने एक वर्षे पूर्ण केल्याचे राऊत सांगत आहेत. सरकारचा कारभार कोणीही करीत असो, गाडी पुढे जातच असते, त्यात नवीन ते काय, असा प्रश्नही दरेकर यांनी उपस्थित केला आहे.

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख