हे तर सत्तेच्या गुळाला चिकटलेले मुंगळे : फडणवीसांची महाआघाडीवर टीका....

शिवस्मारकाच्या संदर्भात गेल्या दोन वर्षात सरकारने काहीही प्रयत्न केलेला नाही. आतातरी स्मारकाबाबत सरकारने प्रयत्न करावा, अशी मागणी त्यांनी केली.
हे तर सत्तेच्या गुळाला चिकटलेले मुंगळे : फडणवीसांची महाआघाडीवर टीका....
These are the ants stuck to the jaggery of power: Fadnavis's criticism of the Mahavikas Aghadi ....

मुंबई : अनैसर्गिक युतीने एकत्र आलेले हे लोक आहेत. त्यांच्याकडे कोणते नियोजन व दृष्टीकोन नाही. ज्याप्रमाणे गुळाच्या ढेपेला मुंगळे चिकटतात,
त्याप्रमाणे सत्तेला चिकटलेले हे तीन पक्ष आहेत. त्यांना सत्तेतील योग्य वाटा मिळत नाही, त्या ठिकाणी अशी ओरड होते. वाटा मिळाला की सर्व बंडोबा थंडोबा होतात, अशी टीका माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केली आहे. 

पत्रकारांना फ्रंटलाइन कामगार घोषित करण्याकडे राज्य सरकारचे दूर्लक्ष होत आहे, याकडे लक्ष वेधले असता श्री. फडणवीस म्हणाले, कोरोनाचे लसीकरण अत्यंत आवश्यक आहे. दोन डोस झाले असले तरी बाधित होण्याचे प्रमाण आहे, त्यामध्ये लक्षणे विरहीत कोरोनाबाधित आढळत येत आहेत. पण ते उपचार घेऊन बरे होऊ शकतात, त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज भासत नाही.

मुळात महाराष्ट्रात पत्रकारांना फ्रंटलाइन कर्मचारी (कोरोना योध्दा) मानण्यास राज्य सरकार का तयार नाही, असे समजत नाही. मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे, त्यांनी तातडीने पत्रकारांना कोरोना योद्धा घोषित करावे, अशी अपेक्षा  व्यक्त करून देशातील १५ राज्यांनी पत्रकारांना फ्रंटलाइन कर्मचारी घोषित केले आहे. मग महाराष्ट्र मागे का, पुरोगामी महाराष्ट्र म्हणून सर्व गोष्टीत सर्वात आधी निर्णय घेणारे राज्य आहे, पण याबाबत का निर्णय होत नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित असून आत्महत्याही वाढल्या असून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दूर्लक्ष होतंय असे वाटते का, यावर श्री. फडणवीस म्हणाले, आत्महत्या होतात या दूदैवी घटना आहेत. शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकूण घेण्याची व्यवस्थाच उरलेली नाही. ज्या प्रकारे बदल्या होतात, अधिकाऱ्यांना पोस्टिंग मिळते, अशा प्रकारे पोस्टिंग घेऊन अधिकारी आले की, त्यांना गरिबांकडे पाहायला वेळ मिळत नाही. मुख्यमंत्र्यांसह सर्वच मंत्र्यांचे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दूर्लक्ष झालेले आहे.

शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय हे सरकार करत नाही. आत्महत्या वाढत असताना या घटनेकडे फार गांभीर्याने बघितले पाहिजे. किमान त्यांच्या मृत्यूनंतर तरी त्याचे प्रश्न सोडविणे व त्यांच्या परिवाराला मदत करणे अपेक्षित आहे. भाजपच्या जनाआशिर्वाद होणाऱ्या टीकेविषयी ते म्हणाले, ज्यांना जत्रेचा अनुभव आहे, त्यांना यात्रा काय समजणार. शेवटी आपापली समज, व्यवहार व संस्कृती असते. मुळातच चारही जनाआशिर्वाद यात्रांना प्रचंड प्रतिसाद मिळालाय. त्यामुळे सरकारी पक्ष हाललाय एवढे निश्चित आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. 

शिवस्मारकाच्या संदर्भात सरकारने गांभीर्याने घेत सर्वोच्य न्यायालयात केस लावून घेतली पाहिजे. कारण त्यावर स्थगिती आहे. ही स्थगिती उठवत नाही. तोपर्यंत बांधकाम पुढे नेता येणार नाही. गेल्या दोन वर्षात सरकारने काहीही प्रयत्न केलेला नाही. आतातरी स्मारकाबाबत सरकारने प्रयत्न करावा, अशी मागणी त्यांनी केली. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in