मराठा आरक्षणासाठी रक्तपात होईल; उदयनराजेंनी भररस्त्यात अडवला गृहराज्यमंत्र्यांचा ताफा - There will be bloodshed for Maratha reservation; Udayanraje stopped the Minister of State for Home Affairs | Politics Marathi News - Sarkarnama

मराठा आरक्षणासाठी रक्तपात होईल; उदयनराजेंनी भररस्त्यात अडवला गृहराज्यमंत्र्यांचा ताफा

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 16 मार्च 2021

उदयनराजे यांच्याबद्दल कोणी काही बोललं तर ते खपवून घेणार नाही. साताऱ्याच्या गादीचा मान ठेवलाच पाहिजे. सातारकर म्हणून आम्हाला त्यांचा अभिमान आहे, असे शंभूराज देसाई नेहमीच म्हणतात. त्यामुळे त्यांच्या या मूजऱ्याची चर्चा ही रंगली आहे. 

सातारा : मराठा आरक्षणावरून खासदार उदयनराजे भोसले यांनी आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारवर सडेतोड टीका करत आरक्षणासाठी रक्तपात होईल, असा इशाराही दिला होता. त्यावर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी उदयनराजेंनी रक्तपाताची भाषा करू नये, सरकारचे काम योग्य दिशेने सुरू असल्याचे प्रतिउत्तर दिले होते. त्यानंतर काल गृहराज्यमंत्री साताऱ्यातील कार्यक्रम उरकून कोल्हापूरला एका लग्न समारंभासाठी निघाले होते. त्याचवेळी खासदार उदयनराजे भोसले ही गोव्याकडे निघाले होते. मंत्री देसाईंच्या गाड्यांचा ताफा पाहून उदयनराजेंनी त्यांची गाडी ताफ्यासोबत नेऊन उभी केली. महामार्गावरच दोघेही गाड्यातून खाली उतरले आणि शंभूराज देसाईंनी नेहमीप्रमाणे उदयनराजेंना मुजरा केला. तर मैत्रीच्या
नात्याने उदयनराजेंनी देसाईंना मिठी मारली.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून उदयनराजेंनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी उदयनराजेंची समजूत काढणार असल्याचे सांगितलं होते. उदयनराजेंनी रक्तपाताची भाषा करू नये, राज्य सरकारचे काम योग्य दिशेने सुरू असल्याचे ही श्री. देसाई यांनी सांगितले होते. साताऱ्यातील या दोन नेत्यांची कोल्हापुरात महामार्गावर झालेली भेट सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.

उदयनराजेंचे मंत्री शंभूराज देसाईंसोबत मैत्रीचे संबंध आहेत. ते नेहमी श्री. देसाईंना भेटून विविध विषयांवर चर्चा करत असतात. ज्या ज्या वेळी उदयनराजे भेटतील, त्या त्यावेळी शंभूराज देसाई हे त्यांना मूजरा करतात. काल साताऱ्यातील कार्यक्रम संपल्यानंतर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई कोल्हापूरला एका लग्न समारंभासाठी निघाले होते. त्याच वेळी खासदार उदयनराजे भोसले ही साताऱ्यातून गोव्याकडे निघाले होते.

कोल्हापूरनजीक शिरोली एमआयडीसीजवळ उदयनराजेंना त्यांच्या पुढे मंत्री शंभूराज देसाई यांच्या गाड्यांचा ताफा निघालेला दिसला. त्यामुळे उदयनराजेंनी त्यांची गाडी ताफ्यासोबत नेऊन उभी केली. उदयनराजेंना पाहून शंभूराज देसाईंनी ताफा थांबविला. तसेच दोघांनी गाडीतून खाली उतरले.

 त्यांनी नेहमी प्रमाणे उदयनराजेंना मुजरा केला. तसेच उदयनराजेंनीही श्री. देसाई यांना मिठी मारली. उदयनराजे यांच्याबद्दल कोणी काही बोललं तर ते खपवून घेणार नाही. साताऱ्याच्या गादीचा मान ठेवलाच पाहिजे. सातारकर म्हणून आम्हाला त्यांचा अभिमान आहे, असे शंभूराज देसाई नेहमीच म्हणतात. त्यामुळे त्यांच्या या मूजऱ्याची चर्चा ही रंगली आहे. 
 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख