सातारा : पोवईनाक्यावरील ग्रेड सेपरेटरचे काल (शुक्रवारी) खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी ग्रेड सेपरेटरच्या
तीनही प्रवेशव्दारांना तीन छत्रपतींची नावे देण्यात आली आहेत. यातील छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा फलक फाडल्याचे सकाळी निदर्शनास आले. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. उदयनराजे समर्थक मोठ्याप्रमाणात घटनास्थळी जमा झाल्याने साताऱ्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते काल पोवईनाका येथील ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन झाले. यावेळी तीनही भुयारी मार्गांना अनुक्रमे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज भुयारी मार्ग, श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज भुयारी मार्ग आणि श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज भुयारी मार्ग असे नामकरण करण्यात आले आहे.
यानंतर आज सकाळी यातील छत्रपती संभाजी महाराज भुयारी मार्ग असे लिहिलेला फलक कोणीतरी अज्ञाताने फाडल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर सातारा शहरात याची माहिती समजताच पोवईनाक्यावर खासदार उदयनराजे समर्थक जमा होऊ लागले. पोलिसांच्या हीबाब निर्दशनास येताच त्यांनी तातडीने हा फलक काढून ताब्यात घेतला.
त्यानंतर उदयनराजे समर्थक ॲड. दत्तात्रेय बनकर, संग्राम बर्गे, सातारा विकास आघाडीचे नगरसेवक व कार्यकर्ते यांनी केवळ संभाजी महाराजांविषयीच असे का घडते, या मागे कोण आहे याचा पोलिसांनी शोध घ्यावा, अशी संतप्त भावना व्यक्त केली. तसेच या घटनेमागे नेमके कोण आहे त्याचा पोलिसांनी तातडीने शोध घ्यावा व संबंधितांवर कारवाई करावी, अन्यथा आम्हाला आंदोलन छेडावे लागेल, असा पवित्रा घेतला.
पोलिसांनी त्यांना शांत राहण्याचे आवाहन करत आम्ही सर्व ती कायदेशीर कारवाई करू असे सांगत होते. बराच वेळ संतप्त उदयनराजे समर्थक आणि पोलिस अधिकाऱ्यांत या प्रकारावरून बराच वेळ वाद सुरू होता. या घटनेमुळे सातारा शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

