दोन हजारांची लाच घेताना तलाठ्यासह मदतनीस जाळ्यात - Talathi and his helper was caught taking a bribe of Rs 2,000 | Politics Marathi News - Sarkarnama

दोन हजारांची लाच घेताना तलाठ्यासह मदतनीस जाळ्यात

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 28 एप्रिल 2021

दोघांतर्फेही तक्रारदार युवकाकडे दोन हजारांच्या लाचेची मागणी झाली होती. त्यानुसार आज ती रक्कम देवून सदर युवक ती कागदपत्रे नेणार होता. त्यापूर्वी संबंधित युवकाने या विरोधात लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आज सापळा रचला होता.

कऱ्हाड : आजोबांच्या जमिनीचा सातबारा उताऱ्यासह सर्च रिपोर्ट देण्यासाठी दोन हजारांची लाच मागणाऱ्या मसूर येथील तलाठ्यासह त्याच्या खासगी मदतनिसास लाचलुचपत प्रतिबंध विभागाने पकडले. मसूर येथील तलाठी कार्यालयात आज दुपारी कारवाई केली. त्याबाबत मसूरच्याच युवकाने तक्रार दिली होती. निलेश सुरेश प्रभुणे (वय 45, रा. मलकापूर, ता. कऱ्हाड) असे तलाठ्याचे, तर रविकिरण अशोक वाघमारे (27 रा. मसूर) असे त्याच्या खासगी मदतनीसाचे नाव आहे.
 
लाचलुचपत विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मसूर येथील युवकाने त्याच्या आजोबांच्या नावाने मसूर येथील त्यांच्या जमिनीचा सातबाराचा उतारा व त्याच्या सर्च रिपोर्टसाठी अर्ज केला होता. बरेच दिवस त्याला ती कागदपत्रे देण्यासाठी टाळाटाळ होत होती. मागणी करूनही तलाठ्यासह मदतनिसाने त्याला कागदपत्रे दिली नाहीत. कागदपत्रे हवी असल्यास काही रक्कम द्यावी लागेल, असे सांगितले.

त्यानुसार दोघांतर्फेही तक्रारदार युवकाकडे दोन हजारांच्या लाचेची मागणी झाली होती. त्यानुसार आज ती रक्कम देवून सदर युवक ती कागदपत्रे नेणार होता. त्यापूर्वी संबंधित युवकाने या विरोधात लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आज सापळा रचला होता. यामध्ये पोलिस उपअधीक्षक अशोक शिर्के, हवालदार राजे, काटकर, येवले, भोसले, अडागळे आदींनी सहभाग घेतला. ठरल्याप्रमाणे तक्रारदार त्यांची कागदपत्रे नेण्यास आला.

त्यावेळी त्याने दिलेले दोन हजार रूपये दोघांतर्फे एकाने स्वीकारले. त्यावेळी तेथे छापा टाकून स्विकारलेल्या रकमेसह संबधितांना लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले. तलाठी प्रभुणे मलकापूर येथे राहतात. मात्र, ते मसूरचे तलाठी आहेत. त्यांचा मदतनीस रविकिरण वाघमारे हा मुळचा मसूरचाच आहे. त्या दोघांच्याही घरी तपासणी होणार आहे, असे लाचलुचपत विभागाने स्पष्ट केले. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख