संत नामदेवांचा सरकारला विसर : शासकिय अभिवादन यादीत नावच नाही...

अजूनही वेळ न गमावता हे वर्ष संत नामदेव जयंती वर्ष घोषित करून महापुरुषांच्या शासकीय अभिवादन यादीत संत नामदेव यांच्या नावाचा समावेश करावा अशी मागणी अक्षय महाराज यांनी या पत्राद्वारे मुख्यंत्र्यांकडे केली आहे.
State government  forget Sant Namdev : There is no name in the government greeting list ...
State government forget Sant Namdev : There is no name in the government greeting list ...

दहिवडी (ता. माण) : महाराष्ट्राचे सुपुत्र तसेच भारताचे प्रमुख व आद्य क्रांतिकारी संत म्हणून ओळख असलेल्या संत नामदेवांचा महाराष्ट्र सरकारला विसर पडला आहे. संत नामदेव यांचे 750 वे जयंती वर्ष असतानाही महापुरुषांच्या शासकीय अभिवादन यादीत त्यांचे नाव नाही. संत नामदेव महाराजांचे नाव या यादीत समाविष्ट करावे आणि शासनाने आपली चूक दुरुस्त करावी, अशी मागणी वारकरी संप्रदाय युवा मंचचे महाराष्ट्र अध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री व राज्यपाल यांना पत्र लिहिले आहे.

अक्षय महाराज भोसले यांनी पत्रात म्हटले की, संत नामदेव यांचे 750 वे जयंती वर्ष असतानाही महापुरुषांच्या शासकीय अभिवादन यादीत संत नामदेव महाराजांचे नाव नाही. संत नामदेव महाराजांचे नाव या यादीत समाविष्ट करावे आणि शासनाने आपली चूक दुरुस्त करावी.

वारकरी संप्रदायाचा देशभर विस्तार करण्यात संत नामदेवांचा सिंहाचा वाटा आहे. संत नामदेव महाराज आपल्या आयुष्याची शेवटची 20 वर्षे पंजाबमध्ये होते. शीख धर्मात संत नामदेवाना 'भगत नामदेव' म्हणून ओळखले जाते. इतक्या वर्षानंतरही पंजाबी लोकांच्या मनात त्यांचे फार मोठे स्थान आहे. महाराष्ट्र आणि पंजाब बरोबरच राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, उत्तरांचल, हिमाचल प्रदेश या राज्यांत संत नामदेव महाराजांची मंदिरे आहेत.

विशेषतः पंजाबमधील त्यांच्या वास्तव्याची व कार्याची जाणीव आजही ठळकपणे मिळत आहे. पत्रात पुढे म्हटले की, संत नामदेव 13 व्या शतकात पंजाबमध्ये गेले. त्यांच्या 65 पदांचा समावेश गुरुग्रंथसाहेब या शिखांच्या धर्मग्रंथात केला आहे. घुमान येथे संत नामदेवांचे मंदिर आहे. उत्तर भारतातील संत नामदेव पहिले संत होते. त्यानंतर होऊन गेलेल्या अनेक संतांनी संत नामदेव महाराजांचा उल्लेख केलेला आहे.

अशा आद्य संताचा त्यांच्या मायभूमी मधील सरकारला विसर पडावा हे दुदैवी असल्याची भावना संत नामदेव महाराजांचे 17 वे वंशज निवृत्ती महाराज नामदास बोलून दाखवतात. याबाबत अजूनही वेळ न गमावता हे वर्ष संत नामदेव जयंती वर्ष घोषित करून महापुरुषांच्या शासकीय अभिवादन यादीत संत नामदेव यांच्या नावाचा समावेश करावा अशी मागणी अक्षय महाराज यांनी या पत्राद्वारे मुख्यंत्र्यांकडे केली आहे.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com