इथेनॉलवरील दुचाकींचे उत्पादन साताऱ्यात सुरू करा; शिवेंद्रसिंहराजेंची राजीव बजाज यांच्याकडे मागणी - Start production of two-wheelers on ethanol in Satara : BJP MLA Shivendraraje's letter to Rajiv Bajaj | Politics Marathi News - Sarkarnama

इथेनॉलवरील दुचाकींचे उत्पादन साताऱ्यात सुरू करा; शिवेंद्रसिंहराजेंची राजीव बजाज यांच्याकडे मागणी

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 8 डिसेंबर 2020

सातार्‍यातील औद्योगिक क्षेत्राला उर्जितावस्ता प्राप्त होण्यासाठी ही कंपनी सुरू होणे गरजेचे आहे. त्यामुळे याबाबत आपण तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा. सातारा येथील प्लांट पुन्हा सुरु करावा, असे शिवेंद्रसिंहराजे यांनी निवेदनात म्हटले आहे.

सातारा : सातारा औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र स्कूटर्स ही एक जुनी कंपनी असून सुमारे ४५ एकर क्षेत्रात विस्तारलेल्या या कंपनीमुळे मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती झाली होती. मात्र, या कंपनीचे कामकाज सध्या बंद आहे. सातार्‍यातील उद्योजकता आणि रोजगार निर्मितीची निकड पाहता ही कंपनी तातडीने सुरु होणे गरजेचे आहे. बजाज उद्योग समुहामार्फत इथेनॉलवर चालणारी दुचाकी निर्मिती करत आहे. अशा दुचाकींची निर्मिती साताऱ्यातील प्लांटमध्ये सुरू करावी, अशी मागणी साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बजाज उद्योग समुहाचे मुख्य व्यवस्थापक राजीव बजाज यांच्याकडे केली आहे. 
 
यासंदर्भात शिवेंद्रसिंहराजे यांनी बजाज यांना निवदेन दिले असून यामध्ये त्यांनी म्हटले की, सातार्‍यातील महाराष्ट्र स्कूटर्स कंपनीचा प्लांट
बंद असल्याने या कंपनीवर अवलंबून असणारे अनेक लहान- मोठे उद्योग बंद पडले आहेत. यामुळे बेरोजगारीची समस्या जटील बनली आहे.

ही कंपनी पुन्हा सुरू झाल्यास त्यावर अवलंबून असणारे लहान- मोठे उद्योग सुरू होऊन सातार्‍यातील औद्योगिकरणास चालना मिळणार आहे. सुशिक्षित आणि गरजू बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे. आपल्या उद्योग समुहाने इथेनॉलवर चालणार्‍या दुचाकी निर्मितीची सुरुवात केली आहे. सातारा येथील प्लांटमध्ये अशा दुचाकींचे उत्पादन घेण्यासाठी कंपनी पुन्हा सुरू करावी, असे  शिवेंद्रसिंहराजे यांनी निवेदनात म्हटले आहे.

सातारा जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखाने इथेनॉलची निर्मिती करत आहेत. पर्यायाने शेतर्‍यांनाही ऊस दर चांगला मिळत आहे. नामांकित आणि प्रथितयश कंपनी म्हणून महाराष्ट्र स्कुटर्सचा नावलौकिक आहे. सातार्‍यातील औद्योगिक क्षेत्राला उर्जितावस्ता प्राप्त होण्यासाठी ही कंपनी सुरू होणे गरजेचे आहे. त्यामुळे याबाबत आपण तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा. सातारा येथील प्लांट पुन्हा सुरु करावा, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख