टोलनाकाप्रश्नी केंद्र सरकारकडून ठेकेदाराची पाठराखण; लॉकडाऊन उठताच साताऱ्यात टोल आंदोलन - As soon as the lockdown is relaxed, there will be a toll waiver movement says MLC Shashikant Shinde | Politics Marathi News - Sarkarnama

टोलनाकाप्रश्नी केंद्र सरकारकडून ठेकेदाराची पाठराखण; लॉकडाऊन उठताच साताऱ्यात टोल आंदोलन

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 9 एप्रिल 2021

आमची पूर्वीपासूनची मागणी आहे, की सातारा जिल्ह्यातील टोलनाक्‍यांवर एमएच ११ आणि एमएच ५० पासिंगच्या वाहनांना संपूर्ण टोलमाफी मिळावी. आता टोलनाक्‍यावर कंत्राटदार बदलला आहे. रिलायन्सकडे महामार्गाचे काम आहे आणि हे काम अद्यापही पूर्ण नाही; परंतु टोल मात्र, दरवाढ करून वसूल केला जात आहे.

कोरेगाव : पुणे-सातारा महामार्गाचे काम 15 वर्षे झाली तरी अद्यापही पूर्ण झालेले नाही. टोल मात्र दरवाढ करून वसूल केला जात आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील जनतेला आनेवाडी टोलनाक्‍यांवर टोल भरावा लागत आहे. तो टोल माफ करावा, अन्यथा लॉकडाऊन उठताच आंदोलन केले जाईल, असा इशारा राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला आहे. 

यासंदर्भातील दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात आमदार शिंदे यांनी म्हटले की, सातारा जिल्ह्यातील लोकांना स्वतःच्याच जिल्ह्यातील टोलनाक्‍यावर टोल भरावा लागत आहे. आता एक एप्रिलपासून टोल दर वाढविला आहे. पुणे-सातारा महामार्गाचे काम 2006 पासून सुरू झाले आणि अद्यापही हे काम पूर्ण नाही. काहींची मागणी आहे, की पाच टक्के टोल कमी करावा.

परंतु आमची पूर्वीपासूनची मागणी आहे, की सातारा जिल्ह्यातील टोलनाक्‍यांवर एमएच ११ आणि एमएच ५० पासिंगच्या वाहनांना संपूर्ण
टोलमाफी मिळावी. आता टोलनाक्‍यावर कंत्राटदार बदलला आहे. रिलायन्सकडे महामार्गाचे काम आहे आणि हे काम अद्यापही पूर्ण नाही; परंतु टोल मात्र, दरवाढ करून वसूल केला जात आहे.

यासंदर्भात राज्याकडे मागणी केली असता, हा निर्णय केंद्राकडे असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे केंद्र सरकार कंत्राटदाराला पाठीशी का घालत आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग वाढल्याने मिनी लॉकडाऊन सुरू आहे. याप्रश्नी आंदोलन करण्यासाठी लोकांना भाग पाडू नये, अशी आमची अपेक्षा आहे.

 सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने या प्रश्नामध्ये लक्ष घालून जिल्हावासीयांना न्याय मिळवून द्यावा. ज्याप्रमाणे पुणे जिल्ह्यातील वाहनांना खेड शिवापूर व अन्य टोलनाक्‍यांवर माफी आहे, त्याच धर्तीवर सातारा जिल्ह्यातील वाहनांना जिल्ह्यातील टोलनाक्‍यांवर टोल माफी मिळावी. लॉकडाउन काळात हा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अन्यथा लॉकडाऊन उठताच आंदोलन केले जाईल, असा इशारा आमदार शिंदे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख