म्हणून उदयनराजेंना पाठविली साडेचारशे रूपयांची मनिऑर्डर - So a money order of four and a half hundred rupees was sent to MP Udayanraje | Politics Marathi News - Sarkarnama

म्हणून उदयनराजेंना पाठविली साडेचारशे रूपयांची मनिऑर्डर

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 17 एप्रिल 2021

जिल्हाधिकारी सिंह यांनी ती रोकड कायदेशीररित्या स्वीकारता येणार नसल्याचे एका ओळीचे पत्र लिहून ते 450 रुपये पुन्हा मनिऑर्डरव्दारे खासदार उदयनराजे भोसले यांच्या निवासस्थानाच्या पत्त्यावर पाठविले आहेत. या रकमेबाबत उदयनराजे काय निर्णय घेतात, याकडे सातारकरांचे लक्ष लागून राहिले आहे. 

सातारा : राज्य शासनाच्या लॉकडाउनला विरोध दर्शवत खासदार उदयनराजे भोसले यांनी भीक मांगो आंदोलन करत जमविलेले साडेचारशे रुपये जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुपूर्द केले होते. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी भीक मांगो आंदोलनातील रोकड न स्वीकारता एका ओळीचे पत्र लिहून ते साडेचारशे रुपये पुन्हा मनिऑर्डरव्दारे खासदार उदयनराजेंच्या राहत्या पत्त्यावर पाठवून दिले आहेत.
 
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने वीकेंड लॉकडाउन पुकारला होता. शासनाच्या आदेशात सुधारणा करत जिल्हा प्रशासनाने अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. जिल्हा प्रशासनाच्या आदेशास विरोध दर्शवत खासदार उदयनराजेंनी शनिवारी (ता.10) पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरील आंब्याच्या झाडाखाली भीक मांगो आंदोलन केले होते. 

आंदोलनावेळी उदयनराजेंनी राज्य सरकारसह जिल्हा प्रशासनावर टीका करत आपला संताप व्यक्‍त केला होता. यानंतर त्यांनी थाळी फिरवत उपस्थितांकडून पैसे जमा केले. भीक मांगो आंदोलनातून जमा केलेल्या साडेचारशे रुपयांची रोकड असणारी थाळी घेऊन ते जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. या वेळी त्यांनी लॉकडाउन मागे घ्यावाच लागेल, न घेतल्यास असंतोषाचा भडका उडेल व त्यास जिल्हा प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा दिला होता. 

त्यांनी दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासन लॉकडाउनबाबत कोणती भूमिका घेते, याकडे सातारकरांचे लक्ष लागून राहिले होते. यानंतर भीकेचे जमा झालेले पैसे जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसिलदारांनी स्वीकारले व ते जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले. जिल्हाधिकारी सिंह यांनी ती रोकड कायदेशीररित्या स्वीकारता येणार नसल्याचे एका ओळीचे पत्र लिहून ते 450 रुपये पुन्हा मनिऑर्डरव्दारे खासदार उदयनराजे भोसले यांच्या निवासस्थानाच्या पत्त्यावर पाठविले आहेत. या रकमेबाबत उदयनराजे काय निर्णय घेतात, याकडे सातारकरांचे लक्ष लागून राहिले आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख