शिवसेनेच्या बेळगाव जिल्हा प्रमुखाला कन्नडिगांची मारहाण : सीमाभागात संतापाची लाट - Shivsena's Belgaum district chief beaten by Kannadiga: A wave of anger at the border | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

शिवसेनेच्या बेळगाव जिल्हा प्रमुखाला कन्नडिगांची मारहाण : सीमाभागात संतापाची लाट

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 12 मार्च 2021

कन्नड संघटनेच्या म्होरक्‍यांना तातडीने अटक करण्याची मागणी केली. पोलिस फक्‍त तक्रार द्या कारवाई करु, अशी माहिती देत होते. परंतु कार्यकर्त्यांनी सुमोटो लावत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. तरीही पोलिस ऐकत नव्हते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी संभाजी चौकात रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला.

बेळगाव : पोलिसांच्या उपस्थितीत शिवसेनेचे बेळगाव जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या वाहनावर कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भ्याड हल्ला केल्याने सीमाभागात संतापाची लाट उसळली आहे. भ्याड हल्ला केल्यानंतर शिवसेनेचा फलक मोडुन काढण्यात आला तसेच वाहनाला काळे फासण्यात आले. त्यामुळे संतप्त झालेल्या मराठी भाषिकांनी कन्नड गुंडाना तातडीने अटक करण्याची मागणी केली. तसेच रामलिंगखिंड गल्लीपासून धर्मवीर संभाजी चौकापर्यंत मोर्चाने जाऊन रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिस कन्नड संघटनांना पाठीशी घालत असल्याचे दिसून आले.

शुक्रवारी दुपारी खडेबाजार पोलिस स्थानकातून शिवसेना जिल्हाप्रमुख शिरोळकर यांना शिवसेनेची रुग्णवाहिका बाजूला लावा, अशी माहिती खडेबाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक धिरज शिंदे यांनी दिली. त्यामुळे शिरोळकर, प्रवीण तेजम व चालक रामलिंगखिंड गल्ली येथील शिवसेना कार्यालयाजवळ जात असताना पोलिस बंदोबस्तात आलेल्या कन्नड संघटनेच्या 10 ते 15 जणांनी वाहन अडवत शिवसेनेचा फलक काढून टाकला.

तसेच त्याला काळे फासण्याचा प्रयत्न केला. अचानकपणे कन्नड कार्यकर्त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. मात्र, शिरोळकर व तेजम यांनी न घाबरता कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्याना बाजुला ठकलुन दिले. तसेच प्रतिकार केला. परंतू मराठी भाषिक जमा होईपर्यंत कन्नड कार्यकर्त्यांनी पळ काढला. ज्यावेळी कन्नड संघटनेचे कार्यकर्ते दंगा करीत होते. त्यावेळी पोलीस मोठ्‌या प्रमाणात हजर होते.

मात्र त्यांनी बघ्याची भूमिका घेतल्याने पोलिस कन्नड गुंडांना पाठीशी घालत असल्याचे मत व्यक्त होत आहे. सीमालढ्याचा केंद्रबिंदू असणाऱ्या महापालिकेसमोर अनधिकृतरित्या लाल पिवळा ध्वज लावण्यात आल्यापासून कन्नड सघटनेच्या गुंडांनी विविध कारणांनी शहरात दहशत माजविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सीमाभागात मराठी भाषिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने शहरात मराठीसह कन्नड व इंग्रजी भाषेत फलक
लावण्यात आले आहेत.

मात्र, मराठीची कावीळ झालेल्या कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मराठी विरोधात कोल्हेकुई करण्यास सुरुवात केली आहे. तसेच मराठी फलकांना काळे फासले जात आहे. त्यामुळे गुरुवारपासून महाराष्ट्र एकीकरण समिती व शिवसेनेच्या कार्यालयाजवळ पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तरीही शिवसेना जिल्हा प्रमुखांच्या वाहनावर हल्ला करण्यात आल्याने मराठी भाषिकांनी तिव्र नाराजी व्यक्‍त करीत शिवसेना कार्यालयाजवळ जमा होण्यास सुरुवात केली.

तसेच कन्नड संघटनेच्या म्होरक्‍यांना तातडीने अटक करण्याची मागणी केली. पोलिस फक्‍त तक्रार द्या कारवाई करु, अशी माहिती देत होते. परंतु कार्यकर्त्यांनी सुमोटो लावत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. तरीही पोलिस ऐकत नव्हते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी संभाजी चौकात रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी रास्ता रोको करून दिला नाही. कार्यकर्ते चौकातून हटण्यास तयार नव्हते. त्यामुळे पोलिस उपआयुक्‍त विक्रम आमटे यांनी येऊन शिरोळकर व समिती कार्यकर्त्यांशी चर्चा केली.

त्यानंतर आमटे यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्रकाश शिरोळकर यांच्या वाहनावर हल्ला झाल्याची माहिती मिळताच शिवसेना कार्यालयाजवळ सह संपर्क प्रमुख अरविंद नागनुरी, युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, माजी महापौर सरीता पाटील, महादेव पाटील, गणेश दड्डीकर, श्रीकांत कदम, धनंजय पाटील, ॲड. महेश बिर्जे, सागर पाटील, सचिन केळवेकर, सुरज कुडुचकर, अश्‍वजीत चौधरी, अंकुश केसरकर, आशुतोष कांबळे, सचिन गोरले, राजकुमार तुडयेकर, सुनिल बोकडे, कृष्णा हलगेकर, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

हल्ला पूर्व नियोजित...

शिरोळकर यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला त्यावेळी खडे बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धिरज शिंदे यांच्यासह अनेक पोलिस उपस्थित होते. तसेच एका कन्नड वृत वाहिनीचे प्रतिनिधीही होते. त्यामुळे हल्ला पूर्व नियोजित होता. तसेच याची माहिती पोलिसांना होती. हे स्पष्ट झाले त्यामुळे कार्यकर्त्यांनी हल्ला झाला, त्यावेळी ड्‌युडीवर कार्यरत असणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी लावुन धरली होती.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख