महाविकास आघाडीत शिवसेनेची फरपट : प्रवीण दरेकर - Shivsena had to lose its rightful place despite being in Mahavikas front : | Politics Marathi News - Sarkarnama

महाविकास आघाडीत शिवसेनेची फरपट : प्रवीण दरेकर

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 24 डिसेंबर 2020

राहुल गांधी यांचा स्वतःच्या पक्षावर प्रभाव आणि परिमाण होत नाही. त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम होण्याचा विषय दूरच आहे, असा टोला श्री. दरेकर यांनी लगावला. 

सातारा : महाविकास आघाडीच्या सत्तेत असल्याने शिवसेनेला नाईलाजास्तव फरपटत जावे लागत आहे. त्यांची इच्छा आहे की नाही हे मी
सांगू शकत नाही, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर केली. विधान परिषदेच्या निवडणुकीत आमच्यावर टीका करणाऱ्या शिवसेनेला महाविकास आघाडीत असूनही आपली हक्काची जागा गमवावी लागली, असेही त्यांनी नमुद केले. 

श्री. दरेकर आज सातारा दौऱ्यावर आले होते, यावेळी त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. ग्रामपंचायतींच्या निवडणुका शिवसेना लढविणार आहे. महाविकास आघाडीत असूनही त्यांच्यात एकमत दिसत नाही, याबाबत तुमचे मत काय, या प्रश्‍नावर प्रवीण दरेकर म्हणाले, सध्या शिवसेनेची फरपट झालेली असून नाइलाजास्तव महाविकास आघाडीत सत्तेत  असल्याने त्यांना फरपटत जावे लागत आहे. त्यांची इच्छा आहे का, हे मलाही माहिती नाही.

विधान परिषदेच्या निवडणुकीत आमच्यावर टीका करताना आमची एकतरी जागा निवडुन आली. पण शिवसेनेची असलेली जागा गेली नाही. सध्या गावागावात राष्ट्रवादीचे वर्चस्व असून काही ठिकाणी काँग्रेसचे अस्तित्व आहे. यामध्ये शिवसनेला दोन्ही काँग्रेस किती स्पेस देणार हा महत्वाचा भाग आहे. त्यामुळे शिवसेना किती जागा लढणार यापेक्षा किती ताकदीने लढतील यावर त्यांचे यश अवलंबून आहे. यश मिळेल का हा तर संशोधनाचा भाग आहे, अशी खिल्लीही त्यांनी उडविली. 

साताऱ्याचे भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजेंना विकास कामासाठी अजित पवार वेळोवेळी मदत करत आहेत. त्याबाबत श्री. दरेकर यांना विचारले असता. ते म्हणाले, अजित दादा हे विकासाच्या कामांमध्ये अगदी रोख ठोक भूमिका घेऊन कामे करतात. याबाबत काहीही दुमत नाही. तसेच राजकारणाच्या पुढे जाऊन एखाद्या शहराच्या विकासासाठी मदत केली तर त्यात काही गैर नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. 

राहुल गांधी यांना काँग्रेसचे अध्यक्ष पद दिले जात आहे. याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होईल, असे विचारले असता ते म्हणाले, राहुल गांधी यांचा स्वतःच्या पक्षावर प्रभाव आणि परिमाण होत नाही. त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम होण्याचा विषय दूरच आहे, असा टोला श्री. दरेकर यांनी लगावला. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख