2019 च्या निवडणूकीत शिवसैनिकांनी माझ्याकडून पैसे घेतले : निलेश राणेंचा गौप्यस्फोट - Shivsainiks took money from me in the election of 2019 elections : Nilesh Rane's allegation | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुंबईतील शेतकरी मोर्चा मेट्रो सिनेमाजवळ अडवला.... राजभवनवर जाण्यासाठी केवळ 20 जणांच्या शिष्टमंडळाला मंजूरी
मुंबईतील शेतकरी मोर्चा मेट्रो सिनेमाजवळ अडवला.... राजभवनवर जाण्यासाठी केवळ 20 जणांच्या शिष्टमंडळाला मंजूरी
सरपंचपदाचे आरक्षण नव्यानेच होणार आणि प्रशासकांच्या कारभाराची चौकशीही होणार

2019 च्या निवडणूकीत शिवसैनिकांनी माझ्याकडून पैसे घेतले : निलेश राणेंचा गौप्यस्फोट

मुझफ्फर खान
सोमवार, 14 डिसेंबर 2020

काहींनी माझ्याकडून 2019 च्या निवडणूकीत शिवसेनेच्या विरोधात काम करण्यासाठी पैसे घेतले होते. ग्रामदेवतेच्या मंदिरात येऊन हे त्यांनी नाकारावे, असे आवाहनही राणे यांनी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांना दिले. खरे शिवसैनिक बाजूला गेले आहेत. आता सर्व डुबलिकेट म्हणजे चायना माल असल्याचा आरोपही राणे यांनी केला. 

चिपळूण : माझ्या पाकिटावर त्यांचे घर चालायचे तेच आज भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. तोंड उघडायला लावू नका. तुमची कुंडली माझ्या डायरीत लिहलेली आहे, असा इशारा भाजपचे नेते माजी खासदार निलेश राणे यांनी चिपळूणातील महाविकास आघाडीच्या नगरसेवकांना दिला. मागील लोकसभा निवडणूकीत शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी माझ्याकडून पैसे घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. 

चिपळूण येथील ब्राह्मण सहाय्यक संघाच्या सभागृहात झालेल्या भाजपच्या मेळाव्यात श्री. राणे यांनी भाजपला सोडून गेलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांवर टीका केली. श्री. राणे म्हणाले, आजचे भाजपवर टीका करत आहेत. ते माझ्याकडून पाकिटे घेऊन जायचे. माझ्या पाकिटावर त्यांचे घर आणि राजकारण चालायचे. तेच भाजपवर टीका करून भ्रष्ट्राचाराचे आरोप करत असल्याचे समजल्यानंतर मी चक्क डोक्याला हात लावून घेतले. 

भाजपबरोबर राहतील म्हणून ज्यांच्यावर मी खर्च केला तेच आज भाजपला सोडून गेलेत. माझी गुंतवणूक बुडाल्याचा आता मला पश्‍चाताप होतोय.  2019 पर्यंत भाजप आणि नगराध्यक्षा सौ. सुरेखा खेराडे त्यांना चांगल्या वाटत होत्या. महाविकास आघाडी झाल्यानंतर भाजप आणि खेराडे वाईट झाल्या कारण पालिकेत याना मलिदा मिळाला नाही, म्हणून काही महिन्यापूर्वी मी नगराध्यक्षांच्या दालनात बैठक घेतली होती.

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची पाहिजे ती कामे करून द्या, अशी सूचना नगराध्यक्षांना केली. नगराध्यक्षांनी माझी सूचना मान्य करून सर्वप्रकारचे सहकार्य त्याना केले तरीही त्यांचे पोट भरले नाही. आम्हाला काही मिळत नाही असे सांगतच काही नगरसेवक भाजपपासून लांब गेले आहेत. पुढील निवडणूकीत त्यांना जनता पालिकेतून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही.

भाजपच्या माध्यमातून चिपळूण शहराचा विकास होत आहे. मात्र, भाजपपासून जे लांब गेलेत त्यांना शहराचा नाही तर आपलाच विकास साधायचा आहे म्हणून त्यांनी शिवसेनेची साथ धरली आहे. त्यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे नगराध्यक्षांची तक्रार केली. जिल्हाधिकार्‍यांनी नगराध्यक्षांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर ह्यांनी जिल्हाधिकार्‍यांची अक्कल काढली. जिल्हाधिकरी म्हणजे न्याय व्यवस्था आहे.

त्याची अक्कल काढण्यापर्यंत आपली अक्कल आहे का, असा सवालही राणे यांनी नगरसेवकांना विचारला. भाजपचे नेते प्रमोज जठार यांच्यावर टिका करण्यासाठी शिवसेनेचे काही नेते एकत्र आले होते. शिवसेनेत कोण बोलतो हेच समजत नाही. जे समोर दिसत होते यातील काहींनी माझ्याकडून 2019 च्या निवडणूकीत शिवसेनेच्या विरोधात काम करण्यासाठी पैसे घेतले होते. ग्रामदेवतेच्या मंदिरात येऊन हे त्यांनी नाकारावे, असे आवाहनही राणे यांनी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांना दिले. खरे शिवसैनिक बाजूला गेले आहेत. आता सर्व डुबलिकेट म्हणजे चायना माल असल्याचा आरोपही राणे यांनी केला. 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख