श्रीमंत कोकाटे यांना जिल्ह्यात फिरकू देणार नाही : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान - Shivpratishthan Hindustan gave supports for sculptures in Satara | Politics Marathi News - Sarkarnama

श्रीमंत कोकाटे यांना जिल्ह्यात फिरकू देणार नाही : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 18 डिसेंबर 2020

ऐतिहासिक दस्तऐवज पुरातत्व खात्याकडे, तसेच धुळे येथील श्री समर्थ वाग्देवता मंदिरात उपलब्ध आहेत. या पुराव्यांकडे दुर्लक्ष करत पुरोगामी आणि परिवर्तनवादी संघटनांनी विनाकारण शिल्पावर आक्षेप घेतला आहे, तसेच काही जण शिल्प हटविण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांवर दबाव आणत असून, त्या प्रवृत्तींचा निषेध करत आहेत. 

सातारा : साताऱ्यातील राजवाडा बस स्थानकात उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्या शिल्पावरून वाद पेटला असून संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ या संघटनांनी या शिल्पाला विरोध दर्शवत या शिल्पामधील रामदास स्वामी असलेला भाग वगळावा अन्यथा महाराष्ट्रात उद्रेक होईल असा इशारा दिला होता. यावरून आज हिंदुत्ववादी संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्या भेटीचे पुरावे सादर केले. तसेच संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ यावर तात्काळ बंदी घालावी. श्रीमंत कोकाटे यांना साताऱ्यात फिरकू देणार नाही, असा इशारा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांनी दिला आहे. 

हिंदुत्वनिष्ठ संघटना, विविध क्षेत्रातील मान्यवर, पक्ष आणि संप्रदायाच्या वतीने हे निवेदन देण्यात आले. या वेळी शहाजीबुवा रामदासी, नगरसेवक प्राची शहाणे, प्रकाश शहाणे, शुभम शिंदे, ऋषिकेश कणसे, चंदन डोंगरे, तेजस ढाणे, अजिंक्‍य गुजर, तसेच प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि धारकरी उपस्थित होते. 

निवेदनातील माहिती अशी, सातारा ही ऐतिहासिक भूमी आहे. या भूमीस छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामींचा पदस्पर्श झाला आहे. या ऐतिहासिक भूमीतील राजवाडा बस स्थानकात शासनाच्या वतीने "शिवसमर्थ'चे शिल्प उभारण्यात आले आहे. हे शिल्प गुरू-शिष्य परंपरेची महती सांगणारे आहे. संपूर्ण जगात, देशात छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांचे नाव आदराने गुरुशिष्य परंपरेत घेतले जाते.

याबाबतचे ऐतिहासिक दस्तऐवज पुरातत्व खात्याकडे, तसेच धुळे येथील श्री समर्थ वाग्देवता मंदिरात उपलब्ध आहेत. या पुराव्यांकडे दुर्लक्ष करत पुरोगामी आणि परिवर्तनवादी संघटनांनी विनाकारण शिल्पावर आक्षेप घेतला आहे, तसेच काही जण शिल्प हटविण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांवर दबाव आणत असून, त्या प्रवृत्तींचा निषेध करत आहेत. निवेदन देण्यापूर्वी शहाजीबुवा रामदासी व इतरांनी समर्थनाच्या बाबतीतील भूमिका मांडली.

नगरसेवक काटवटे यांनीही हा वाद चुकीचा असून, शिल्पाच्या बाजूने शिवप्रेमी, धर्मप्रेमींनी समर्थन दिल्याचे सांगत शंका असणाऱ्यांनी पुराव्यानिशी चर्चेला येण्याचे आव्हान दिले. तर संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघावर तात्काळ बंदी घालावी. तसेच श्रीमंत कोकाटे यांना साताऱ्यात फिरकू देणार नाही, असा इशारा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने दिला आहे. 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख