एटीएम बदलून लाखोंचा गंडा घालणारी आंतरराज्य टोळी गजाआड - Shirwal police have nabbed an inter-state gang which was robbing lakhs of rupees by changing ATMs | Politics Marathi News - Sarkarnama

एटीएम बदलून लाखोंचा गंडा घालणारी आंतरराज्य टोळी गजाआड

अश्पाक पटेल
शनिवार, 13 मार्च 2021

आतापर्यंत कर्नाटक, गोवा, मध्यप्रदेश व गुजरात तसेच नगर, सोलापुर या जिल्ह्यातील अनेक गुन्हे उघडीस आणण्यास पोलिसांना यश आले आहे. यासंबंधी कोणाची तक्रार असल्यास शिरवळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक उमेश हजारे यांनी केले आहे. 

शिरवळ : एटीएम कार्डची अदलाबदल करून हातचलाखीने लाखो रूपयांचा गंडा घालणारी आंतरराज्य टोळीतील चार संशयितांना शिरवळ पोलिसांनी अटक करून बेड्या घातल्या आहेत. संबंधित संशयिताकडून राष्ट्रीयकृत बॅंकेची ६५ एटीएम कार्ड, आठ हजार शंभर रुपयांची रोकड व कार असा तीन लाख आठ हजार रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई आनेवाडी टोल नाक्‍यावर शुक्रवारी सायंकाळी उशीरा करण्यात आली. 

यासंदर्भात शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिरवळ येथील निलेश शिवाजी सुर्वे यांना आसले (ता.वाई) व इतर ठिकाणाहुन आपल्या खात्यावरुन पैसे गेल्याचे कळल्यानंतर त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी गोवा येथून या संशयिताचा पाठलाग करुन आनेवाडी (ता. जावळी) येथील टोलनाक्‍यावर कार (क्रमांक एम.एच.०४ इटी ०३८९) ताब्यात घेतली.

यातील प्रदिप साहेबराव पाटील, विकी राजु वानखडे, किरण कचरू कोकणे व महेश पांडुरंग धनगर ( सर्व रा.म्हारळगांव, उल्हासनगर, ठाणे) या संशयितांना ताब्यात घेतल. दरम्यान, आज खंडाळा न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. एटीएममध्ये रांगेत थांबुन दुसऱ्याला पैसे काढण्यास मदत करण्याच्या बहाण्याने हातचलाखीने एटीएम कार्ड बदलुन लाखो रूपयांचा गंडा ही टोळी घालत असे.

आतापर्यंत कर्नाटक, गोवा, मध्यप्रदेश व गुजरात तसेच नगर, सोलापुर या जिल्ह्यातील अनेक गुन्हे उघडीस आणण्यास पोलिसांना यश आले आहे. यासंबंधी कोणाची तक्रार असल्यास शिरवळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक उमेश हजारे यांनी केले आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख