कोरेगाव : शशिकांत शिंदे आणि महेश शिंदे या दोन्ही आमदारांसाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या कोरेगाव मतदारसंघातील सातारारोड (पाडळी), ल्हासुर्णे, देऊर या प्रमुख ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे कोरेगाव मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.
तालुक्यातील कोरेगाव मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रातील 34 ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. त्यापैकी नागेवाडी, चिलेवाडी, कोलवडी, होलेवाडी, भिवडी, बोधेवाडी या सहा ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे.
पाडळी स्टेशन (सातारारोड), अरबवाडी, अंबवडे (संमत वाघोली), कटापूर, किन्हई, पेठ किन्हई, गोगावलेवाडी, गोडसेवाडी, जांब बुद्रुक, त्रिपुटी, तांदूळवाडी, तांबी, दुघी, दुधनवाडी, शेंदूरजणे, नलवडेवाडी (बिचुकले), देऊर, निगडी, बोरजाईवाडी, भक्तवडी, भाकरवाडी, भोसे, भंडारमाची, मध्वापूरवाडी, मंगळापूर, रेवडी, ल्हासुर्णे, बिचुकले या 28 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे.
यापैकी प्रामुख्याने सातारारोड (पाडळी), ल्हासुर्णे, देऊर या ग्रामपंचायतींची निवडणूक शशिकांत शिंदे आणि महेश शिंदे या दोन्ही आमदारांसाठी प्रतिष्ठेची आहे. सातारारोड (पाडळी) ग्रामपंचायतीच्या 17 पैकी तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित 14 जागांसाठी 32 जण रिंगणात उतरले आहेत. कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या तीन पक्षांच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे जरंडेश्वर महाविकास आघाडी पॅनेल उभे केले आहे.
त्यांच्या विरोधात आमदार महेश शिंदे पुरस्कृत जरंडेश्वर ग्रामविकास पॅनेल उभे ठाकले आहे. याशिवाय चार अपक्षदेखील रिंगणात आहेत. माजी मंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांचे माहेर असलेल्या या गावच्या ग्रामपंचायतीमध्ये शशिकांत शिंदे आणि महेश शिंदे यांच्यापैकी कोणाच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन होणार, याकडे लक्ष लागले आहे.
ल्हासुर्णे ग्रामपंचायतीच्या 11 जागांसाठी 22 जण रिंगणात उतरले आहेत. आमदार शशिकांत शिंदे यांचे निवासस्थान या गावात असून, स्थानिक कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस, राष्ट्रवादी पुरस्कृत श्री नवलाईदेवी परिवर्तन पॅनेल उभे केले आहे. त्यांच्या विरोधात आमदार महेश शिंदे यांच्या समर्थकांचे श्री नवलाईदेवी ग्रामविकास पॅनेल उभे ठाकले आहे.
गेल्या दोन पंचवार्षिकपासून या ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवण्यासाठी आमदार शशिकांत शिंदे प्रयत्नशील आहेत आणि याच पार्श्वभूमीवर यावेळी कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांची मोठी फळी मैदान लढवत आहे. दुसरीकडे स्थानिक समर्थकांच्या माध्यमातून या ग्रामपंचायतीवर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात आमदार महेश शिंदे आहेत.
त्यामुळे ल्हासुर्णे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला राजकीयदृष्ट्या महत्त्व आहे. देऊर ग्रामपंचायतीच्या 11 जागांसाठी दोन अपक्षांसह 29 जण रिंगणात उतरले आहेत. राष्ट्रवादीचे बहुतांश समर्थक असलेल्या एका गटाने शेतकरी पॅनेलच्या माध्यमातून आठ जागांवर, तर भैरवनाथ पॅनेलने तीन जागांवर उमेदवार उभे करून हे दोन्ही पॅनेल एकत्रितपणे मतदारांना सामोरे जात आहेत.
राष्ट्रवादीच्या दुसऱ्या गटाने देऊर विकास आघाडीच्या माध्यमातून आठ जागांवर, तर आमदार महेश शिंदे यांच्या समर्थकांच्या परिवर्तन पॅनेलने आठ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. एकूणच या ठिकाणची ही बहुरंगी लढत लक्षवेधी आहे.

