शरद पवार लागले निवडणुकीच्या तयारीला : पराभूत उमेदवारांना बोलावलं बैठकीला..

राष्ट्रवादीचे काही उमेदवार विधानसभा निवडणुकीत अगदी थोड्या मतांनी पराभूत झाले आहेत, अशा नेत्यांवर काही महत्त्वाची जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता आहे.
शरद पवार लागले निवडणुकीच्या तयारीला : पराभूत उमेदवारांना बोलावलं बैठकीला..
Sharad Pawar to review constituencies; Wednesday meeting of MLAs and former MLAs

मुंबई : २०१९ मध्ये राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढून विजयी झालेले व पराभूत झालेल्या उमेदवारांची महत्वपूर्ण बैठक बुधवारी (ता ८) सकाळी नऊ वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. Sharad Pawar to review constituencies; Wednesday meeting of MLAs and former MLAs

ही बैठक पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली प्रस्तावित होती. मात्र पवारसाहेबांच्या तब्येतीमुळे पुढे ढकलण्यात आली होती. आता ही बैठक आदरणीय शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणार आहे.  या बैठकीत विजयी व पराभूत झालेल्या मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. राष्ट्रवादीने पुढील  निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरु केली आहे. पुढच्या काही महिन्यात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. तसेच पाच महापालिकांच्या निवडणुका होत आहेत. त्या दृष्टीने या बैठकीत नेत्यांना काही महत्त्वाच्या सूचना तसंच विविध विषयांवर चर्चा होणे अपेक्षित आहे.

राज्यात जरी महाविकास आघाडीचं सरकार असलं तरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडत असल्याने स्थानिक पातळीवरचे निर्णय तिथल्या स्थानिक नेत्यांवर पक्ष सोपविण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे काही उमेदवार विधानसभा निवडणुकीत अगदी थोड्या मतांनी पराभूत झाले आहेत, अशा नेत्यांवर काही महत्त्वाची जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता आहे.

एकुणच सप्टेंबरच्या बैठकीत निवडणूक आणि त्यासंबंधीची चर्चा होणार आहे. शरद पवार यांनी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक बोलावून त्यांच्याशी खात्यांर्गत विविध विषयांवर आणि त्यांच्य कामावर चर्चा केली. गेल्या एका महिन्यापासून राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक झाली नव्हती. मात्र मंगळवारी अर्थात 31 ऑगस्टला ही बैठक झाली.

महाविकास आघाडीच्या नेत्यांना येणाऱ्या ईडीच्या नोटीस, भाजपची नुकतीच झालेली 'जनआशिर्वाद यात्रा' या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवारांनी बोलावलेल्या या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व बडे नेते उपस्थित होते. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री छगन भुजबळ, मंत्री जितेंद्र आव्हाड, मंत्री राजेश टोपे, मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्व 16 मंत्र्यांचा समावेश होता.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in