सगळ्या आमदारांना मूकबधिरांच्या शाळेत पाठवा : उदयनराजेंचा घणाघात - Send all MLAs to school for the deaf and dumb says MP Udayanraje | Politics Marathi News - Sarkarnama

सगळ्या आमदारांना मूकबधिरांच्या शाळेत पाठवा : उदयनराजेंचा घणाघात

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 11 मार्च 2021

उदयनराजे म्हणाले, नक्षलवादी कशातून निर्माण होतात. न्याय मिळत नाही म्हणूनच निर्माण होतात ना. हीच मंडळी नक्षलवादी निर्माण करतात. कोणीपण असो, पक्ष कोणताही असो सगळ्यांची सामुहिक जबाबदारी आहे. ही जबाबदारी कोणीही टाळू शकत नाहीत. प्रत्येकजण जबाबदार असून यामध्ये विरोधी पक्षही आलाच.

सातारा : ज्यांना लोकांनी निवडून दिले त्या सो कॉल्ड आमदारांनी सांगावे की या या कारणांसाठी आम्ही मराठा आरक्षण देऊ शकलेलो नाही. पण ते काहीच बोलत नाहीत. त्यामुळे या सगळ्यांना मूकबधिरांच्या शाळेत घाला, नको तिथेही नको..., मेंटल हॉस्पिटलमध्ये टाकून द्या, असा घाणाघात भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे. 

मराठ आरक्षण प्रश्नावर उदयनराजेंनी राज्य सरकारवर आज पुन्हा टीकेची झोड उठवली आहे. जलमंदीर पॅलेस या त्यांच्या निवासस्थानी त्यांच्याशी मराठा आरक्षणाच्या विषयावर पत्रकारांनी संवाद साधला. उदयनराजे म्हणाले, तुम्हाला लोकांनी निवडून दिले आहे. त्यामुळे या सो कॉल्ड आमदारांनी जनतेला सांगून टाकावे या कारणांसाठी आम्ही मराठा आरक्षण देऊ शकत नाही.

पण ते काहीही बोलत नाहीत. या सगळ्यांना मूकबधिरांच्या शाळेत घाला. नको तिथेही नको, मेंटल हॉस्पिटलमध्ये टाकून द्या. तुम्ही विष पिणार असे म्हटले आहे, याबाबत विचारले असता उदयनराजे म्हणाले, हो विष पिणारच आहेत. पण त्यांना विष पाजणार आहे. ज्यावेळी माणसाच्या गळ्यापर्यंत येते, त्यावेळी तो म्हणतो मी का आत्महत्या करू. त्यांच्यामुळे समाजावर अत्याचार होता आहेत. राज्यकर्त्यांनी अशी तशी तर वाटच लावली. त्यामुळे आता त्यांचीच वाट लावून टाका.

उदयनराजे म्हणाले, नक्षलवादी कशातून निर्माण होतात. न्याय मिळत नाही म्हणूनच निर्माण होतात ना. हीच मंडळी नक्षलवादी निर्माण करतात. कोणीपण असो, पक्ष कोणताही असो सगळ्यांची सामुहिक जबाबदारी आहे. ही जबाबदारी कोणीही टाळू शकत नाहीत. प्रत्येकजण जबाबदार असून यामध्ये विरोधी पक्षही आलाच. लोकप्रतिनिधींना निवडून देतात विविध समाजाचे लोक मतदान करतात.

त्यामध्ये मराठा समाजही असून त्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे त्यांचीही अपेक्षा असणारच, कुठेतरी न्याय द्या. तो देऊ शकला नाहीत. तर या लोकांनी काय करायचे. सगळे एकत्र यायला काय करावे हवे, या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले, राजकारण इतके भिनलेले आहे की राजकारण राजकारण म्हणता म्हणता त्या पलिकडे गजकरण झाले आहे.

रक्तपात हाच एक मार्ग...

आम्ही सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी बैठक घेतली. पण ते आले नाहीत. त्यामुळे ज्या लोकांनी मतदान केले ते त्यांना जागा दाखवतील. मराठा आरक्षणाबाबत कोणी नेतृत्व करायचे म्हटले की उदयनराजेंचे नाव समोर येते. तुम्हाला वाटते का यातून आरक्षण प्रश्नावर मार्ग निघेल या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले, रक्तपात हाच एक मार्ग आहे आणि हा होणारच.

कारण सर्वत्र बेकारी वाढणार  आहे. त्यामुळे अशा सर्व गोष्टी होणारच. पोलिसही काहीही करू शकणार नाहीत. हा इतका सोपा विषय नाही. आरक्षण ठेवायचे असेल तर आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये ठेवा. मुस्लिम, सिंधी, गुजर या लोकांसाठीही ठेवा. आर्मीमध्ये कोण जाते मराठा, रजपूत व शिख हे जातात. हे सगळे सीमेवर आहेत. त्याचा परिणाम यांच्या मनावर होणारच ना. मग तुमच्या देशाच्या सीमेचे कोण रक्षण करणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

सर्व गोष्टी पैशावर चालत नाहीत. आतपर्यंत एवढे पैसे यांनी ढापलेत. त्याचे काय एकमेकाला 'क्लिन चिट' देऊन रिकामी झाली आहेत, वा... राज्य सरकारबाबत तुमचे मत आहे, यावर उदयनराजे म्हणाले, काय बोलणार सगळेच तज्ञ आहेत, वा...सगळ्यांना माहिती आहे, चालतेय तोपर्यंत चालवायचे. मग गाडा न्या पुढे मग वढा, असे मिश्किलपणे उत्तर त्यांनी दिले.

पैशाचा विषय आला तर....

सध्याचे सरकार पाच वर्षे टिकेल का, यावर उदयनराजे म्हणाले, काय माहिती पाच दिवस टिकते की पाच वर्षे. पण पैशाचा विषय आला तर नक्कीच पाच वर्षे टिकेल. पण मराठा आरक्षणाचा विषय आला तर काय खरं नाही, असे त्यांनी सांगितले. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख