दोन मोहितेंच्या एकत्रीकरणाची सतेज पाटील, विश्वजित कदमांवर जबाबदारी  - Satej Patil, Vishwajit Kadam responsible for the amalgamation of the two Mohites | Politics Marathi News - Sarkarnama

दोन मोहितेंच्या एकत्रीकरणाची सतेज पाटील, विश्वजित कदमांवर जबाबदारी 

हेमंत पवार
रविवार, 21 मार्च 2021

दोन्ही मोहितेंचा समन्वय साधून एकाच व्यासपीठावर आणण्याचे धनुष्य कसे पेलले जातंय यावर पुढील लढतीचे चित्र ठरणार आहे. त्यामुळे आता त्यातून काय साध्य होणार याकडे काँग्रेस जनांच्या नजरा लागल्या आहेत. 

कऱ्हाड : कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत डॉ. सुरेश भोसले व अतुल भोसले यांच्याविरोधात डॉ. इंद्रजित मोहिते आणि अविनाश मोहिते गटांनी एकत्रित येऊन निवडणूक लढवावी, असा काँग्रेस जणांचा प्रयत्न सुरू आहे. त्याचा विचार करून आता थेट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच लक्ष घातले आहे. त्यांनी दोन्ही मोहितेंना एकत्रित आणण्यासाठी गृह राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील आणि कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. 

पृथ्वीराज बाबांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच काँग्रेसच्या  गटाची बैठक झाली. त्यामध्ये स्वतः श्री. चव्हाण, ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, कॉंग्रेसचे कऱ्हाड दक्षिणचे अध्यक्ष मनोहर शिंदे, युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये कार्यकर्त्यांनी भोसले गटाला पर्यायाने भाजपला या निवडणुकीमध्ये रोखण्यासाठी डॉ. इंद्रजित मोहिते व अविनाश मोहिते यांनी एकत्रितपणे निवडणूक लढवावी, अशी जोरदार मागणी बाबांकडे केली.

दोन्ही गट एकत्र आल्यास मतविभाजन टाळून दोन्ही गटांलाही त्याचा फायदा होईल अन्यथा मतांची विभागणी होऊन दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ, अशी स्थिती होईल, असे कार्यकर्त्यांनी त्या बैठकीत पोटतिडकीने मांडले. त्याचा विचार करून आमदार चव्हाण यांनी यामध्ये स्वतः लक्ष घातले आहे. त्यांनी दोन्ही मोहितेंना एकत्रित आणण्यासाठी गृह राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील आणि कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्यावर जबाबदारी दिली आहे. त्या दोघांनी दोन्ही मोहितेंचा समन्वय साधून एकाच व्यासपीठावर आणण्याचे धनुष्य कसे पेलले जातंय यावर पुढील लढतीचे चित्र ठरणार आहे. त्यामुळे आता त्यातून काय साध्य होणार याकडे कॉंग्रेस जणांच्या नजरा लागल्या आहेत. 

महाविकास आघाडीचाही पॅटर्न...

महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार आहे. यापुढील निवडणुका या महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवून तेथील सत्ता ताब्यात घेण्याची तयारी तिन्ही पक्षांनी केली आहे. त्यासंदर्भात मुंबईत तिन्ही पक्षांच्या वरिष्ठांची खलबते झाली आहेत. त्यामुळे आता कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठीही तोच फॉर्म्युला वापरून तेथील सत्ता ताब्यात घेण्यासाठी नेत्यांची चर्चा सुरू आहे. 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख