कोरोना संसर्ग : साताऱ्यातील कडक निर्बंध आठ जूनपर्यंत कायम - Satara's severe lockdown lasted eight days | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोना संसर्ग : साताऱ्यातील कडक निर्बंध आठ जूनपर्यंत कायम

उमेश बांबरे
सोमवार, 31 मे 2021

किरकोळ ग्राहक व किरकोळ विक्रेत्यांना यांना खरेदी करण्यास मनाई असेल. घाऊक व्यापाऱ्यांनी किरकोळ व्यापाऱ्यांना विक्री करावी लागणार आहे. मात्र, त्यासाठी सोशल डिस्टसिंगचे पालन करावे लागणार आहे. मात्र, फळे, व भाजीपाला सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत घरपोच देण्यास परवानगी आहे. त्याचे नियोजन उपविभागीय अधिकारी यांनी करायचे आहे. उर्वरित सर्व काही बंद राहणार आहे. 

सातारा : कोरोना रूग्णांची साखळी तुटण्यासाठी सध्याचे लॉकडाउन (Corona Pandemic) शासनाने 15 जूनपर्यंत वाढवले आहे. तर जिल्ह्यातील रूग्णांची वाढती संख्या पाहता साखळी तुटण्यासाठी सध्या लागू असलेले कडक लॉकडाउन (Strict Lockdown) जिल्हाधिकारी शेखर सिंह (Shekhar shinh) यांनी आणखी आठ दिवस म्हणजेच ८ जूनपर्यंत वाढविले आहे. यामध्ये औषधे दुकाने, शेतीशी संबंधित दुकाने, रेशन दुकाने, घरपोच भाजीपाला व फळे वितरण यांना वेळेच्या बंधनात सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. उर्वरित सर्व काही बंद राहणार आहे. Satara's severe lockdown lasted eight days

जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार 17 मे पासून कडक लॉकडाउन लागू केले आहे. जिल्ह्यातील बाधितांची आकडेवारी कमी होत नसल्याने उद्या (एक जून) पासून संपणारे कडक लॉकडाऊन आणखी आठ दिवस म्हणजे आठ जूनपर्यंत कायम ठेवले आहे. पण काही बाबींना यामध्ये थोडी सुट देण्यात आली आहे.

हेही वाचा : सचिवपदाच्या निवडीत जयवंतराव जगतापांनी दिली विरोधक बंडगरांना धोबीपछाड

त्यानुसार रेशन दुकाने सकाळी सात ते अकरा यावेळेत उघडण्यास परवानगी दिली आहे. या दुकानातून सध्या मोफत धान्य वितरण सुरू आहे. तसेच औषधे दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी सात तर हॉस्पिटलमधील औषध दुकाने 24 तास सुरू राहणार आहेत. कृषीशी संबंधित बियाणे, खते, उपकरणे दुरूस्ती व विक्रीची दुकाने सकाळी सहा ते अकरा यावेळेत सुरू राहतील. त्यामुळे खरिप हंगामासाठी शेतकऱ्यांना खते, बियाणे खरेदी करणे सोपे झाले आहे.

आवश्य वाचा : केंद्र सरकार म्हणतंय, पूर्व विदर्भातील तांदूळ खाण्यायोग्य नाही; नानांचा खळबळजनक आरोप..

कृषी उत्पन्न बाजार समितीत फळे, भाजीपाला घाऊक पध्दतीने खरेदी विक्रीसाठी सुट देण्यात आली आहे. त्यानुसार सकाळी सहा ते अकरा यावेळेत हे व्यवहार सुरू राहतील. किरकोळ ग्राहक व किरकोळ विक्रेत्यांना यांना खरेदी करण्यास मनाई असेल. घाऊक व्यापाऱ्यांनी किरकोळ व्यापाऱ्यांना विक्री करावी लागणार आहे. मात्र, त्यासाठी सोशल डिस्टसिंगचे पालन करावे लागणार आहे. मात्र, फळे, व भाजीपाला सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत घरपोच देण्यास परवानगी आहे. त्याचे नियोजन उपविभागीय अधिकारी यांनी करायचे आहे. उर्वरित सर्व काही बंद राहणार आहे. 

वर्तमानपत्रे घरपोच मिळणार..... 
लॉकडाउन कडक राहणार असले तरी वर्तमानपत्रे, मासिके, नियतकालिके छपाईस व वितरणास परवानगी राहणार आहे. मात्र, त्याचे वितरण केवळ घरपोच करत येणार आहे, असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी स्पष्ट केले आहे. 

हे बंद राहणार... 
व्यापारी दुकाने, किराणा, किरकोळ विक्रीची सर्व दुकाने,  उपहारगृहे, बार, लॉज, हॉटेल्स, रिसॉट, मॉल बाजार, मार्केट, भाजी मार्केट, फळ मार्केट, आठवडी, दैनंदिन बाजार, मंडई फेरीवाले, वाईन शॉप, बिअर शॉपी, देशी दारूची दुकाने,  मटन, चिकन, अंडी, मासे विक्री, रस्त्याच्या कडेला असणारी खाद्य दुकाने , बेकरी पदार्थ विक्री 
माल वाहतूक, दुरस्ती गॅरेज, स्पेअरपार्टस्‌ विक्री दुकाने,  माल वाहतूक व अत्यावश्‍यक सेवा वाहनांच्या दुरूस्तीची गॅरेज, रिझर्व्ह बॅंकेने विहित केलेल्या सेवा, एसटीची प्रवासी वाहतूक सेवा, नॉन बॅंकिंग वित्तीय महामंडळे, सुक्ष्म वित्तीय संस्था, बांधकामाशी संबंधित सर्व क्रिया, सिनमागृहे, नाट्यगृहे, करमणूक नगरी. 

हे सुर राहणार.... 
सहकारी बॅंका एटीएममध्ये पैसे भरणे, चेक क्‍लिअरन्स, डाटा सेंटर कामे सकाळी अकरा ते दोन. रिक्षा, टॅक्‍सी अत्यावश्‍यक सेवेसाठी, खासगी वाहतूक अत्यावश्‍यक सेवेसाठी, खासगी बसेसने आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक (50 टक्के प्रवाशी), पेट्रोल पंप अत्यावश्‍यक वाहनांसाठी 24 तास सुरू, व्हेटरीनरी हॉस्पिटल, ऍनिमल केअर शेल्टर्स व पेट शॉप्स, दूध संकलन केंद्रे सकाळी सात ते नऊ व सायंकाळी सहा ते आठ घरपोच सुविधा, कृषी विषयक दुकाने सकाळी नऊ ते तीन तर घरपोच सुविधा सकाळी नऊ ते सात, शिवभोजन थाळी केवळ पार्सल सुविधा, शीतगृहे व गोदाम सेवा, मान्सून पूर्व सेवा व उपक्रम, स्थानिक प्राधिकरणांच्या सर्व सार्वजनिक सेवा, भारतीय सुरक्षा मंडळ कार्यालये, टेलिकॉम सेवेतील दुरस्ती व देखभाल, ई- व्यापार.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख