सातारा एसपींची धडक कारवाई; चार टोळ्यांतील 18 गुंडांना केले तडीपार 

सातारा शहर, वाई, शाहूपुरी, कऱ्हाड पोलिस ठाण्याच्या हद्दीत गर्दी मारामारी, खून, शरिर व मालमत्तेचे नुकसान, घरफोडी अशा विविध गुन्ह्यात सहभागी असलेल्या चार टोळ्यातील गुंडांना तडीपार करावे, अशी मागणी स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी एसपी अजयकुमार बन्सल यांच्याकडे केली होती.
Satara SP's take action; 18 gangsters from four gangs were deported
Satara SP's take action; 18 gangsters from four gangs were deported

सातारा : मारामारी, खून, खुनाचा प्रयत्न व घरफोडी अशा विविध गुन्ह्यांत सहभागी होऊन जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या जिल्ह्यातील चार टोळ्यांतील 18 गुंडांना पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी आज सातारा जिल्ह्यातून तडीपार केले आहे. 

सातारा शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत खून, गर्दी मारामारी तसेच शरीर व मालमत्तेविरुद्धचे गुन्हे असलेल्या टोळीतील आमीर इम्तियाज मुजावर (वय 22, रा. पिरवाडी, ता. सातारा), आमीर सलीम शेख (वय 19, रा. वनवासवाडी), अभिजित ऊर्फ आबू राजू भिसे (वय 18, रा. सैदापूर, ता. सातारा), सौरभ ऊर्फ गोट्या संजय जाधव (वय 20, रा. सैदापूर), जगदीश रामेश्‍वर मते (वय 20, रा. रांगोळे कॉलनी, शाहूपुरी) व आकाश हणमंत पवार (वय 20, रा. सैदापूर) या सहा जणांच्या टोळीला जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.

त्यांना तडीपार करण्याबाबत सातारा शहर पोलिसांनी प्रस्ताव पाठविला होता. शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी, चोरी व मारामारीचे गुन्हे करणाऱ्या टोळीतील सागर नागराज गोसावी (वय 23), विपुल तानाजी नलवडे (वय 20), अक्षय रंगनाथ लोखंडे (वय 20), अर्जुन नागराज गोसावी (वय 35) व रवी नीलकंठ घाडगे (वय 25, सर्व रा. सैदापूर, ता. सातारा) या पाच जणांना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. त्यांना तडीपार करण्याबाबत शाहूपुरी पोलिसांनी प्रस्ताव पाठविला होता. 

वाई पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये गर्दी मारामारी, दुखापत करणे, शासकीय कामात अडथळा व सरकारी नोकरास दुखापत करणे असे गुन्हे दाखल असलेल्या टोळीतील रॉकी निवास घाडगे (वय 29), कृष्णा निवास घाडगे (वय 23) व सनी निवास घाडगे (वय 30, सर्व रा. लाखानगर, सोनगिरवाडी, वाई) या टोळीला जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. याबाबत वाई पोलिसांनी प्रस्ताव पाठविला होता.

 कऱ्हाड शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न, गर्दी मारामारी, दुखापत करणे असे गुन्हे दाखल असलेल्या टोळीतील आशिष अशोक पाडळकर (वय 32), इंद्रजित हणमंत पवार (वय 24), अनिकेत रमेश शेलार (वय 21, सर्व रा. मलकापूर, ता. कऱ्हाड) व सुदर्शन हणमंत चोरगे (वय 20, रा. कोयना वसाहत, कऱ्हाड) या चार जणांना दोन वर्षांसाठी सातारा जिल्हा तसेच कडेगाव, वाळवा, शिराळा या तीन तालुक्‍यांतून तडीपार करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांनी दिले आहेत.

या कारवाईमध्ये अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक किशोर धुमाळ, कऱ्हाड शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बी. आर. पाटील, सहायक पोलिस निरीक्षक विजय गोडसे, कऱ्हाड शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाचे कर्मचारी, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, शाहूपुरी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक व्ही. के. वायकर, वाई पोलिस ठाण्याचे निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी सहभाग घेतला. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक मधुकर गुरव यांनी या सर्व प्रस्तावांच्या सुनावणीदरम्यान पुरावा सादर करण्याचे काम केले. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com