सातारच्या सैनिक स्कुलमध्ये कोरोनाचा शिरकाव; तीन विद्यार्थ्यांना संसर्ग - Satara Sainik Schools six students tested corona positive | Politics Marathi News - Sarkarnama

सातारच्या सैनिक स्कुलमध्ये कोरोनाचा शिरकाव; तीन विद्यार्थ्यांना संसर्ग

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 18 मार्च 2021

या मुलांच्या संपर्कात आलेल्या इतर मुलांचीही चाचणी केली जाणार आहे. आरोग्य विभागाचे एक पथक तेथील परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे,  असे जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरूध्द आठल्ये यांनी सांगितले.

सातारा : सातारा सैनिक स्कूल मधील तीन विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या तीन विद्यार्थ्यांना सैनिक स्कुलमध्येच विलगीकरण कक्षात ठेऊन उपचार सुरू केले आहेत. विद्यार्थ्यांची प्रकती स्थिर आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. त्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाचे पथक त्याठिकाणी रवाना झाले आहे.

आज पालकमंत्री बाळासाहेब पाटील व जिल्हाधिकारी शेखर सिंह तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरूध्द आठल्ये यांनी सैनिक स्कुलला भेट देऊन याची माहिती घेतली आहे. सैनिक स्कुलची पहाणीदरम्यान, स्कुलचे प्राचार्य उज्वल घोरमोडे यांनी याबाबतची माहिती पालकमंत्र्यांना दिली. 

सध्या सातारा जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला असून बुधवारी रात्री आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील ३०३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. उपचार घेत असलेल्या तीन बाधितांच मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात फलटण तालुक्यातील तरडगाव कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. येथे कालपर्यंत २२ रूग्ण सापडले आहेत. तसेच सध्या सर्वाधिक रूग्ण फलटण
तालुक्यात आहेत.

मागील दोन आठवड्याभरापूर्वी माण तालुक्यात व त्यानंतर खटाव तालुक्यातील पुसेगाव येथे कोरोनाचे रूग्ण सापडले होते. त्यानंतर प्रशासनाने तातडीने उपाय योजना करत चाचण्या वाढविल्या आहेत. तसेच निकट सहवासितांच्या चाचण्या करण्यावर भर दिला आहे. सध्या जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून प्रत्येक तहसिल कार्यालय परिसरात कोरोना केअर सेंटर सुरू केले आहे.

तसेच आज पालकमंत्र्यांनी या सर्व पार्श्वभूमीवर कोरोना आढावा बैठक घेऊन
लसीकरण वाढविण्याची सूचना केली आहे. तसेच व्यापारी व व्यावसायिकांनी चाचण्या करून दुकानावर बसावे, अशी सूचना केली आहे.  हे सर्व सुरू असतानाच आज सातारा सैनिक स्कुलमध्येही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. येथील तीन विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. या विद्यार्थ्यांवर सैनिक स्कुलमध्येच उपचार सुरू आहेत. या सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

जिल्हा रूग्णालयात सैनिक स्कुलचे तीन विद्यार्थी चाचणी करण्यासाठी आले होते. त्यांचा अहवाल कोरोनाबाधित आला. पालकमंत्र्यांनी आज सैनिक स्कुलची पहाणी केली. त्यावेळी सैनिक स्कुलचे प्राचार्य उज्वल घोरमाडे यांनी याबाबतची माहिती पालकमंत्र्यांना दिली. या मुलांच्या संपर्कात आलेल्या इतर मुलांचीही चाचणी केली जाणार आहे. आरोग्य विभागाचे एक पथक तेथील परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे,  असे जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरूध्द आठल्ये यांनी सांगितले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख