'अजिंक्यताऱ्या'च्या विकासासाठी सातारा पालिकेची झाली किल्ल्यावर सभा - Satara Municipality held a meeting at the fort for the development of 'Ajinkyatarya' | Politics Marathi News - Sarkarnama

'अजिंक्यताऱ्या'च्या विकासासाठी सातारा पालिकेची झाली किल्ल्यावर सभा

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 12 जानेवारी 2021

नगराध्यक्षा कदम यांनी अजिंक्‍यतारा किल्ला सातारा पालिकेच्या हद्दीत आला आहे. यापूर्वी पालिकेने किल्ल्याच्या विकासासाठी 60 लाखांचा निधी मंजूर केला होता. आता या निधीत वाढ करण्यासाठीचा विषय येत्या पालिकेच्या सभेत घेण्यात येणार असल्याचेही सांगितले. 

सातारा : अजिंक्‍यतारा किल्ल्यावर आज झालेल्या सातारा पालिकेच्या पहिल्या विशेष सभेत किल्ल्याचा विकास करण्यासाठी विकसन आराखडा (डीपीआर) तयार करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. हा ठराव पुढील मंजुरीसाठी नगरविकास मंत्रालयास सादर करण्याबरोबर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे सादर करण्याच्या विषयावर या सभेत चर्चा झाली. पालिकेच्या इतिहासात सभागृहाबाहेर झालेली ही पहिलीच सभा ठरली आहे. 

तब्बल दहा महिन्यांच्या कालावधीनंतर येथील पालिकेची विशेष सभा छत्रपती शाहू महाराज यांचे अजिंक्‍यतारा किल्ल्यावर याच दिवशी मंचकारोहण झाले होते. त्यानिमित्त गेल्या काही वर्षांपासून साजऱ्या करण्यात येणाऱ्या "सातारा स्वाभिमान दिना'च्या औचित्याने अजिंक्‍यतारा किल्ल्यावर सभा आयोजित करण्यात आलेली होती.

या सभेसाठी नगराध्यक्षा माधवी कदम, उपाध्यक्ष मनोज शेंडे, मुख्याधिकारी अभिजित बापट, नगरसेवक निशांत पाटील, ऍड. दत्ता बनकर, शेखर मोरे, किशोर शिंदे, राजू भोसले, ज्ञानेश्‍वर फरांदे, बाळासाहेब ढेकणे, सुनील काळेकर, श्रीकांत आंबेकर, सभापती सीता हादगे, स्नेहा नलावडे, सिध्दी पवार, रजनी जेधे, सुजाता राजेमहाडिक तसेच पालिका अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

सुरुवातीस ॲड. दत्ता बनकर यांनी सभेपुढे अजिंक्‍यतारा किल्ल्याचा विकास आराखडा तयार करण्याचा विषय मांडण्यात येणार असल्याचे सांगितले. या विषयात किल्ल्यावरील तळ्यांचे सुशोभीकरण, बगीचा निर्माण करणे, ऐतिहासिक वास्तूंचे जतन, पुनर्निर्माण करण्याचा तसेच त्यासाठी विविध विषयांतील तज्ज्ञांचा समावेश असलेल्या 48 जणांची समिती स्थापण्याच्या उपविषयांचा समावेश असल्याचे ऍड. बनकर यांनी स्पष्ट केले.

यानंतर बाळासाहेब ढेकणे यांनी या विषयाच्या अनुषंगाने मत मांडत सर्वप्रथम किल्ला परिसरातील रस्ता दुरुस्तीला प्राधान्य देण्याची मागणी केली. निशांत पाटील यांनी किल्ल्याच्या अनुषंगाने तयार करण्यात येणारा विकास आराखडा नगरविकास मंत्रालयास सादर करतानाच त्या अनुषंगाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेण्याचा विषय उपस्थित केला. सभेसाठी उपस्थित असणाऱ्या नगरसेवकांची मते जाणून घेतल्यानंतर मांडलेला विषय एकमताने मंजूर करण्याचे आवाहन नगराध्यक्षा कदम यांनी केले.

यानुसार उपस्थित नगरसेवकांनी विषय मंजुरीचा होकार नोंदवला. विषय मंजूर झाल्याचे जाहीर करत नगराध्यक्षा कदम यांनी अजिंक्‍यतारा किल्ला सातारा पालिकेच्या हद्दीत आला आहे. यापूर्वी पालिकेने किल्ल्याच्या विकासासाठी 60 लाखांचा निधी मंजूर केला होता. आता या निधीत वाढ करण्यासाठीचा विषय येत्या पालिकेच्या सभेत घेण्यात येणार असल्याचेही सांगितले. 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख