सातारा : ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनी 1961 रोजी पायाभरणी केली होती. मात्र, ते चालवण्यासाठी पुरेसा निधी मिळत नाही. 40 वर्षांपासून सेवा बजावलेल्या तेथील शिक्षकांना पेन्शन व इतर सोयी-सुविधा मिळत नाहीत, अशी खंत साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केली. दरम्यान, सैनिक स्कुलचे प्रलंबित प्रश्न व समस्यांची माहिती घेतली असून त्या सोडविण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
साताऱ्यातील येथील सैनिक स्कूलला खासदार श्रीनिवास पाटील यांनी आज भेट दिली. तसेच तेथील प्रलंबित प्रश्न व असणाऱ्या समस्यांविषयी माहिती जाणून घेतली. सैनिक स्कूलच्या समस्या सोडविण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन या वेळी त्यांनी दिले. खासदार पाटील यांनी नुकताच लोकसभेत तेथील प्रश्नासंदर्भात आवाज उठवून केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते. त्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष सातारा येथील सैनिक स्कूलला आज भेट दिली. सातारा जिल्हा हा शूरवीरांचा आणि सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.
या जिल्ह्याने स्वातंत्र्योत्तर काळात लढाईमध्येही मोठे योगदान दिले आहे. ही परंपरा आपल्या सैनिकांनी आजतागायत सुरूच ठेवली आहे. इतर जिल्ह्याच्या तुलनेत सातारा जिल्ह्यातून सैन्यदलात भरती होण्याचे प्रमाण प्रचंड आहे. सातारा येथे सैनिक स्कूल असून, त्याची ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनी 1961 रोजी पायाभरणी केली होती. मात्र, ते चालवण्यासाठी पुरेसा निधी मिळत नाही. 40 वर्षांपासून सेवा बजावलेल्या तेथील शिक्षकांना पेन्शन व इतर सोयी-सुविधा मिळत नाहीत.
त्यासंदर्भात खासदार पाटील यांनी संबंधितांशी अनेकदा पत्रव्यवहारही केला आहे. त्यानंतर नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या अधिवेशनात पहिल्यांदा त्यांनी हा मुद्दा उपस्थित करून याविषयी सभागृहाचे लक्ष वेधून घेत सैनिक स्कूलला ऊर्जितावस्था आणण्याची मागणी केली होती. त्यानंतर आज त्यांनी प्रत्यक्ष सैनिक स्कूलला भेट देऊन पाहणी केली. तेथील प्रलंबित प्रश्न व असलेल्या समस्यांची माहिती घेऊन त्या सोडविण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी सैनिक स्कूलचे प्राचार्य ग्रुप कॅप्टन उज्वल घोरमाडे, कॅप्टन प्रमोद पाटील उपस्थित होते.

