'कृष्णा'त काँग्रेससोबत जायचं का; सातारा, सांगलीचे पालकमंत्री ठरविणार - The role of the Guardian Minister of Satara, Sangli in the bouquet regarding Krishna factory | Politics Marathi News - Sarkarnama

'कृष्णा'त काँग्रेससोबत जायचं का; सातारा, सांगलीचे पालकमंत्री ठरविणार

सचिन शिंदे 
शनिवार, 20 मार्च 2021

राष्ट्रवादीची भूमिका काय राहणार, काँग्रेससोबत जायचे की नाही, याचा निर्णय पक्षीय पातळीवर होणार आहे. हा निर्णयही अद्याप गुलदस्त्यात आहे. हा निर्णय घेण्यात राष्ट्रवादीचे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील व सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. अन्यथा कारखाना निवडणुकीत तीन पॅनेल समोरासमोर येतील, अशी स्थिती आहे. 

कऱ्हाड : यशवंतनगर येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अविनाश मोहिते व काँग्रेसचे डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या एकत्रीकरणासाठी काँग्रेस आग्रही आहे. याबाबत सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील व साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी अद्याप कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे काँग्रेसच्या एकत्रिकरणाची एकतर्फीच चर्चा होत असल्याचे चित्र आहे. 

"कृष्णा'च्या रणांगणात गटबांधणी सुरू आहे. सत्ताधाऱ्यांना चौकटीत विरोध करण्यापेक्षा व्यापक विचाराने विरोधाच्या भूमिकेसाठी डॉ. इंद्रजित मोहिते अग्रेसर आहेत. त्यासाठी पक्षीय अजेंड्यावर त्यांचा भर आहे. कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत कॉंग्रेसने राष्ट्रवादीशी सोबत करावी, यासाठी आमदार पृथ्वीराज चव्हाण, ॲड. उदय पाटील- उंडाळकर यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मते मांडली.

तसा तालुकानिहाय अजेंडा कार्यकर्त्यांनी नेत्यांसमोर ठेवला. कृष्णा कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील पलूस, कडेगाव व कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ काँग्रेसकडे, तर कऱ्हाड उत्तर, वाळवा, शिराळ्याचा भाग राष्ट्रवादीकडे आहे. तेथील नेत्यांचा त्या भागात प्रभाव आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रात राष्ट्रवादीच्या बरोबरीने काँग्रेसचा प्रभाव आहे, असा दावा डॉ. मोहिते गटाचा आहे. 

त्यामुळे त्यांनी त्या पद्धतीने बांधणी केली आहे. आमदार चव्हाण यांच्यासोबत दोन बैठकाही झाल्या आहेत. मंत्री विश्वजित कदम यांच्यासोबत मुंबईला बैठक झाली आहे. आमदार चव्हाण, ॲड. पाटील- उंडाळकर यांच्यासोबत येथे व्यापक बैठक झाली आहे. त्यात आखणी स्पष्ट समोर आली आहे. सत्ताधारी भोसले गट म्हणजे भाजपभोवती चक्रव्यूह आखण्याच्या रणनीतीसाठी राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्धार काँग्रेसच्या गटाने व्यक्त केला आहे.

काँग्रेसतर्फे सुरू झालेली कारखान्याच्या एकत्रीकरणाची चर्चा आतापर्यंत एकतर्फी ठरली आहे. कॉंग्रेसच्या या भूमिकेवर राष्ट्रवादीचे नेते काहीही बोलण्यास तयार नाहीत. राष्ट्रवादीचे व संस्थापक पॅनेल नेते अविनाश मोहिते यांना राष्ट्रवादीतून पाठबळ आहे. मात्र, काँग्रेसच्या एकत्रिकरणाबाबत कोणीच काही बोलण्यास तयार नाही. तो मुद्दाच चर्चेला आलेला नाही.

राष्ट्रवादीची भूमिका काय राहणार, काँग्रेससोबत जायचे की नाही, याचा निर्णय पक्षीय पातळीवर होणार आहे. हा निर्णयही अद्याप गुलदस्त्यात आहे. हा निर्णय घेण्यात राष्ट्रवादीचे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील व सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. अन्यथा कारखाना निवडणुकीत तीन पॅनेल समोरासमोर येतील, अशी स्थिती आहे. 

एकत्रिकरणाची मोहितेंनाच माहिती नाही... 
कृष्णा कारखान्यात अविनाश मोहिते व डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या गटाच्या एकत्रिकरणाची चर्चा आहे. मात्र, ती केवळ डॉ. मोहिते यांच्या गटाकडून केली जात आहे. त्यासाठी तीन वेगवेगळ्या बैठका झाल्या. मात्र, अद्याप एकाही बैठकीची माहिती संस्थापक पॅनेलचे अविनाश मोहिते यांना कोणीही दिलेली नाही. त्यामुळे एकत्रीकरणाच्या चर्चा व सगळ्या बैठकांचे नियोजन काँग्रेसच्या त्यातही डॉ. मोहिते गटातील पहिल्या, दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते करत आहेत.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख