साताऱ्यात धोका वाढला; पाच धरणांतून ६७ हजार ८७३ क्युसेक पाणी नदीपात्रात; नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी 

नदीपात्रातील पाणी नागरीवस्‍तीत शिरत असल्‍याने नदीकाठावर सतर्कतेचा इशारा देण्‍यात आला असून अनेक ठिकाणच्‍या नागरीकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्‍यावर प्रशासनाने जोर दिला आहे.
साताऱ्यात धोका वाढला; पाच धरणांतून ६७ हजार ८७३ क्युसेक पाणी नदीपात्रात; नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी 
The risk increased; 67 thousand 873 cusecs of water from five dams in Satara into river basin; Rivers crossed danger levels

सातारा : गेले तीन दिवस सातारा जिल्‍ह्‍याच्‍या विविध भागात मुसळधार पाऊस सुरु असून धरणक्षेत्रातील पावसाच्‍या नोंदी रेकॉर्डब्रेक ठरल्‍या आहेत. पाण्‍याची आवक जास्‍त असल्‍याने धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्‍यासाठी कोयना धरणासह सर्वच प्रमुख धरणांतून सध्‍यस्‍थितीत ६७ हजार ८७३ क्‍यूसेक इतक्‍या पाण्‍याचा विसर्ग नदीपात्रात सुरु आहे. या विसर्गामुळे सर्वच नद्यांच्‍या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली असून पाणी धोका पातळी ओलांडून नागरीवस्‍तीत शिरत आहे. 

समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्‍याने सातार्‍यासह इतर जिल्‍ह्‍यात अतीवृष्‍टीचा इशारा वेधशाळेने वर्तवला होता. या इशार्‍याच्‍या पार्श्वभूमीवर जिल्‍हा प्रशासनाने आवश्‍‍यक त्‍या उपाययोजना राबविण्‍यास सुरुवात केली होती. कोयना पाणलोट क्षेत्रात येणार्‍या महाबळेश्‍‍वर, नवजा, जोर आणि वलवण येथे गेल्‍या तीन दिवसांत सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे कोयना धरणात येणार्‍या पाण्‍याची आवक वाढली आहे. 

पाणीपातळी नियंत्रित करण्‍यासाठी या धरणातून सध्‍यस्‍थितीत पायथा वीजगृह आणि सहा वक्र दरवाजे उचलून नदीपात्रात ३५ हजार १७१ क्‍यूसेक इतके पाणी सोडण्‍यात येत आहे. विसर्गामुळे नदीपात्रातील पाणी धोकापातळी ओलांडून नागरीवस्‍तीत शिरण्‍यास सुरुवात झाली आहे. याचबरोबरच धोम धरणातून सध्‍यस्‍थितीत ५ हजार ११० क्‍यूसेक, कण्‍हेर धरणातून सहा हजार ७८४ क्‍यूसेक, उरमोडी धरणातून चार हजार ३८३ क्‍यूसेक, तारळी धरणातून ११ हजार ३९४ क्‍यूसेक धोम-बलकवडी धरणातून पाच हजार ३१ क्‍यूसेक इतके पाणी नदीपात्रात सोडण्‍यात येत आहे. धरणात येणार्‍या पाण्‍याची आवक वाढल्‍यास आगामी काळात विसर्ग क्षमतेत वाढ होण्‍याची शक्‍यता आहे. 

कोयना, उरमोडी, तारळी, वेण्‍णा, उत्तरमांड या उपनद्यातुन मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्‍याने मुख्‍य नदी असणार्‍या कृष्‍णानदीच्‍या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाली आहे. सध्‍या सर्वच नद्यांतून प्रतिसेकंद ६७ हजार ८७३ क्‍यूसेक इतके पाणी वाहत आहे. या पाण्‍यामुळे सर्वच कृष्‍णेसह सर्वच उपनद्यांनी धोकापातळी ओलांडत नागरीवस्‍तीला घेरण्‍यास सुरुवात केली आहे. 

नदीपात्रातील पाणी नागरीवस्‍तीत शिरत असल्‍याने नदीकाठावर सतर्कतेचा इशारा देण्‍यात आला असून अनेक ठिकाणच्‍या नागरीकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्‍यावर प्रशासनाने जोर दिला आहे. पावसाचे प्रमाण असेच राहिल्‍यास धरणातील पाणीविसर्गात मोठ्या प्रमाणात वाढ होण्‍याची शक्‍यता असून त्‍याचा ताण आगामी काळात नागरीकांचे स्‍थलांतर, तात्‍पुरत्‍या पुनर्वसनावर येणार आहे.  

 
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in